Aaditya Thackeray : वीस टक्के राजकारणाला गौण समजत आम्ही 80 टक्के समाजकारणावर लक्ष केंद्रित करून काम करीत राहिलो म्हणून गद्दारी झाली. त्याचा जाब महाराष्ट्रातील जनता या गद्दारांना नक्की विचारेल, असे शिवसेना नेता आदित्य ठाकरे म्हणाले.  हिम्मत असेल तर गद्दारी करणाऱ्यांनी मतदारांचा विश्वासघात करून मिळालेली आमदारकी, खासदारकीचा राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जावे असे आव्हानही यावेळी आदित्य ठाकरे यांनी दिले. ते भिवंडी येथून सुरू झालेल्या शिवसंवाद यात्रे निमित्त शिवाजीचौक या ठिकाणी झालेल्या सभेत बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील संपर्क प्रमुख रुपेश म्हात्रे,भारतीय कामगार सेनेचे माजी सरचिटणीस कृष्णकांत कोंडलेकर,तालुका प्रमुख विश्वास थळे, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, भिवंडी महानगरप्रमुख शाम पाटील मनोज गगे, मदन भोई, स्थायी समिती माजी सभापती संजय म्हात्रे, इरफान भुरे,महिला संपर्क संघटक कलाताई शिंदे, रुपल संजय पाटील उपस्थित होते.  


मागील महिनाभर संपूर्ण महाराष्ट्रात दूषित वातावरण जनता पाहत होती,जे चित्र अत्यंत क्लेशदायक होते. ज्यांना शिवसैनिकांनी डोक्यावर घेऊन मोठे केले, ते धोका देऊन निघून गेले. जी सर्कस सुरू आहे ती लोकशाहीला पटणारी आहे का? असा सवाल उपस्थित जनतेला आदित्य ठाकरे यांनी केला. तसेच आशा परिस्थितीत उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी राहणार की नाही? असे विचारताच शेकडोंनी हात उंच करून त्यास प्रतिसाद दिला. ज्यांना लहानपणापासून मातोश्रीवर येताना पहात होतो, त्यांनी पाठीत खंजीर खुपसला, त्यांना अपचन झाल्याने ते हलले. पण शिवसेना हललेली नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले. 


गद्दारी करणारे त्यांच्या पळून जाण्याला उठाव व बंड असे नाव देतात. पण ते बंड अथवा उठाव नव्हता, तर गद्दारी होती. बंड करायला हिम्मत लागते बंड करणारे असे परराज्यात पळून जात नाहीत, ते शूरवीर नव्हे तर पळपुटे ठरले, गद्दारी करणाऱ्या आमदारांना सांगतो तुमच्यावर दडपण असेल, भीती असेल तेथे गेलात आनंदात रहा, असे आदित्य ठाकरे म्हणाले.  


लाज उरली असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या, निवडणुकीला सामोरे जा, जे होईल ते मान्य होईल. ज्यांना परत यायचे आहे त्यांना मातोश्रीचे दरवाजे 24 तास उघडे आहेत, असे सांगत महाराष्ट्रात पूर परिस्थिती निर्माण झालेली असताना दोन मंत्र्यांचे सरकार स्वतःला वाचवीत फिरत आहे. पण हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणार हे सत्य आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले. ही गर्दी सच्चा शिवसैनिकांची आहे, चांगल्या लोकांना राजकारणात स्थान नसतं, तुम्ही तयार आहेत का? उद्धव ठाकरे यांचे राजकारणातील स्थान मजबूत करायला? त्यांना त्यांचे स्थान मिळवून देणारा का? असा प्रश्न जनतेला केला. उद्धव ठाकरे आजारी असताना त्यांच्या वेदना मुलगा म्हणून जवळून पहिल्या. त्याही परिस्थितीत ते काम करीत असताना मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे भेटत नाहीत. तेव्हाच यांनी गद्दारील सुरवात केली, असे शेवटी सांगत मला फक्त तुमचे प्रेम आणि विश्वास आणि आशीर्वाद हवे आहेत ते फक्त द्या, पुन्हा नव्याने उभे राहू असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.