मुंबई : राज्यातील कोरोना संकटाचा धोका लक्षात घेता जाहीर केलेल्या लॉकडाऊनचा फटका राज्यातील पशुधनालाही बसला आहे. पावसाळ्यात बैल, गाई, म्हशी, शेळ्या, कोंबड्या अशा शेतक-यांशी संबंधित जनावरांना साथीच्या रोगांचा धोका अधिक असतो. मान्सूनपूर्व काळात या जनावरांची काळजी व आजारांपासून संरक्षण करण्यासाठी दरवर्षी पशुसंवर्धन विभागामार्फत मान्सूनपूर्व लसीकरण मोहीम राबविण्यात येते. याअंतर्गत यंदा एकूण 1 लाख 28 हजार लससाठा उपलब्ध झाला असून त्यातनं एकूण 4 लाख 89 हजार पाळीव जनावरांना लसीकरण करण्यात येणार आहे. मात्र या लसी साठवून ठेवण्यासाठी विभागाकडे पुरेसे कोल्ड स्टोरेज उपलब्ध आहेत का?, असा सवाल उपलब्ध होत आहे.


काँग्रेसच्या सुनील केदार यांच्याकडे सध्या पशुसंवर्धन खात्याची जबाबदारी आहे. एकीकडे महाविकास आघाडी सरकारमध्ये योग्य वागणूक मिळत नसल्याची भावना व्यक्त करत काँग्रेसचे नेते नाराज असल्याच्या चर्चा आहेत. त्यात पशुसंवर्धन खात्याकडनं कोल्ड स्टोरेज खरेदीसाठी मंजूरी मिळूनही प्रशासकीय अधिकारी त्यावर अंमल करत नाहीत अशी परिस्थिती सध्या राज्यात पाहायला मिळतेय. 27 फेब्रुवारी रोजी पशुसंवर्धन खात्यानं संबंधित विभागाला 1 मार्चपूर्वी हे कोल्ड स्टोरेज खरेदीचे आदेश दिले होते. मात्र हे काम जून महिना संपत आला तरी पूर्ण झालेलं नाही.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या 20 लाख कोटींच्या पैकेज मध्ये पशुसंवर्धनालाही विशेष महत्व दिले आहे. ज्यात लस साठवणूकीसाठी केंद्रानं राज्याला 25 कोटी रूपये दिले आहेत. राज्यात सध्या 3 हजार पशुवैद्यक दवाखाने आहेत मात्र त्यापैकी केवळ दिड हजार दवाखान्यांतच हे कोल्ड स्टोरेज उपलब्ध आहेत. त्यामुळे अनेक दवाखन्यांत लसी उपलब्ध असूनही लसीकरणाचे काम अद्याप सुरू झालेले नाही.


पावसाळ्यात या जनावरांना विविध साथीचे आजार होत असतात. यासाठी शेतकऱ्यांनी या जनावरांची विशेष काळजी घेणं आवश्यक असतं. योग्य लसीकरण केल्यास हे साथीचे आजार उद्भवणार नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांनी जनावरांचे वेळेत लसीकरण करावे, असे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे. पावसाळ्यात होणाऱ्या या आजारांमुळे पशुधन दगावण्याची शक्यता असते. त्याचा दुध पुरवठ्यावरही परिणाम होतो. या आजारांत घटसर्प, एकटांग्या, आंत्रविषार, लाळ खुरकूत, तोंडखुरी आदी संसर्गजन्य आजारांची समावेश आहे. त्यामुळे लवकरात लवकर हे लसीकरण पूर्ण होणं गरजेचं आहे.