Pravin Darekar on Manoj Jarange Patil : सलाईनमधून विष देण्याचा आणि माझं एन्काऊंटर करण्याचा फडणवीसांचा डाव होता, असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर केला आहे. यावरून भाजपचे विधान परिषदेतील गटनेते आमदार प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी मनोज जरांगे पाटलांवर हल्लाबोल केला आहे. देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करून सागर बंगल्यावर जर जरांगे जाणार असतील तर आता आम्हालाही यावर अ‍ॅक्शनला रिअ‍ॅक्शन द्यावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. 


प्रवीण दरेकर म्हणाले की, मनोज जरांगेंनी आता तोंड सांभाळून बोलण्याची आवश्यकता आहे. मराठा समाजाला जे आरक्षण पाहिजे ते सरकारने दिलेले आहे. आता नेमके जरांगेंना काय हवे आहे.  जरांगेंना देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करून राजकारण करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. यामागचा बोलावता धनी कोण आहे? हे सरकारने शोधण्याची आवश्यकता आहे.


जरांगेंनी लिमिटमध्ये राहावे


उठ सूट मराठा समाजाला काय वाटते, मराठा समाजाने काही सातबारा जरांगेंच्या नावावर केलेला नाही. देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करून सागर बंगल्यावर जर जरांगे जाणार असतील तर आता आम्हालाही यावर अ‍ॅक्शनला रिअ‍ॅक्शन द्यावी लागेल, त्यामुळे तुम्ही आपल्या लिमिटमध्ये राहावे, असे त्यांनी यावेळी म्हटले आहे. 


...तर आम्हाला सागर बंगल्यावर जशाच तसे उत्तर द्यावे लागेल


आतापर्यंत मराठा समाजाने आपल्याला समर्थन दिले. मात्र तुम्ही आता पूर्णपणे राजकारणी झालेले आहात. तुमचं बोलवता धनी कोण आहे हे महाराष्ट्राला माहीत आहे. ज्यांनी आपल्या आयुष्याच्या हयातीत मराठा आरक्षण दिले नाही, ते आता तुमच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करीत आहेत. सरकार म्हणून तुम्ही बोला, मात्र सागर बंगला, देवेंद्र फडणवीस, अशा प्रकारच्या कृती सहन केल्या जाणार नाहीत. आता जरांगे त्रस्त झालेत आणि त्यामुळे ते इतक्या टोकाची भाषा बोलत आहेत. सरकारने याची दखल घ्यावी, नाहीतर आम्हाला सागर बंगल्यावर जशाच तसे उत्तर द्यायला थांबावे लागेल, असे प्रवीण दरेकर म्हणाले. 


काय म्हणाले आशिष शेलार?


मराठा समाजाला न्याय मिळावा, आरक्षण मिळावे, याचे भाजपने नेहमीच समर्थन केले आहे. ⁠जरांगे पाटील यांच्या मागणीला आम्ही पाठींबा दिलाय. ⁠ज्या करता कायदेशीर प्रक्रिया पुर्ण होणे गरजेचे आहे. त्यांचे आरोप बिनबुडाचे आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्यांची शपथ पूर्ण केली. देवेंद्रजींबद्दल बोलताना विचार केला पाहिजे. त्यांनी केलेले आरोप आम्ही फेटाळतो. मुंबईला ते येऊ शकतात", अशी प्रतिक्रिया आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी दिली आहे. 


आणखी वाचा 


Narendra Patil on Manoj Jarange : जरांगे पाटलांचा तोल सुटलाय, त्यांचा बोलवता धनी कोण? फडणवीसांवर आरोप होताच भाजप आक्रमक