Prashna Maharashtrache : Maharashtra Minister Bachchu Kadu : आज एबीपी माझाच्या प्रश्न महाराष्ट्राचे कार्यक्रमात शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू (Maharashtra Minister Bachchu Kadu) यांच्याशी खास बातचित करण्यात आली. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर आपली मतं मनमोकळेपणानं मांडली. कोरोना संकटात शिक्षणात अधोगती आली. तब्बल दोन वर्षांहून अधिक काळ शाळा बंद होत्या. मात्र तरीदेखील केंद्रीय शिक्षण खात्यानं 2021 मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार, महाराष्ट्र शैक्षणिक गुणवत्तेत आजही अव्वल असल्याची माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली. तसेच, शिक्षण विभागातील रखडलेल्या भरत्या लवकरात लवकर घेऊ असं आश्वासनंही त्यांनी दिलं आहे. एवढंच नाहीतर, शैक्षणिक विषमतेबाबत बोलताना शैक्षणिक विषमता अत्यंत घातक असून ती देशाला पोकळ करु शकते, असं बच्चू कडू म्हणाले.
महाराष्ट्राचे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले की, "कोविडमुळे शिक्षण क्षेत्रातील मंदावलेला वेग वाढवून गुणवत्ता आणखी वाढवणार आहे. तसेच, शाळा बंद असल्यामुळे आधी सुटलेले विषय 30 दिवसांत शिकवले जाणार आहेत. हा अनुशेष सेतू अभ्यासक्रमातून भरुन काढणार आहोत." पुढे शाळांच्या फीसंदर्भात बोलताना बच्चू कडू म्हणाले की, "शालेय शुल्काच्या मुद्यावर कोर्टाकडून स्थगिती देण्यात आली होती. कोर्टाच्या स्थगितीमुळे 80 टक्के वसुली रखडली आहे.", तसेच पुढे बोलताना शिक्षण शुल्क अधिनियम शाळांनी मोडित काढल्याची माहितीही शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली आहे.
दहावी, बारावीचे निकाल कधी लागणार?
दहावी, बारावीचा निकाल कधी लागणार? मे अखेरपर्यंत हा निकाल लागतो, पण यंदा काहीसा उशीर होणार आहे, त्यामुळे अकरावी प्रवेशासाठीही उशीर होणार का? असा प्रश्न विचारल्यावर याबाबत बोलताना शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितलं की, "दहावी, बारावीचे निकाल येत्या पंधरा दिवसांत जाहीर करु. जरी उशीर झाला, तरी दहावीनंतरची अकरावी प्रवेश प्रक्रिया आणि बारावीनंरची प्रवेश प्रक्रिया व्यवस्थितपणे हाताळण्याचा प्रयत्न करु." तसेच, 20 जूनपर्यंत दहावी, बारावीचे निकाल जाहीर होतील का? असं विचारल्यावर "शक्यता आहे. मी निश्चितपणे सांगू शकत नाही. पण 20 जूनपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे, असं बच्चू कडू म्हणाले.
"उशीर झाला तरी आपण सगळ्या गोष्टी व्यवस्थित पूर्ण करु. कोरोना काळात काही गोष्टींची उणीव नक्की राहिली. पण तरिही देशाच्या एकंदरीत गुणवत्तेत महाराष्ट्र अव्वल आहे, ही महत्त्वाची बाब आहे. कोरोना काळातही शिक्षकांनी दुर्गम भागांमध्ये जात अनेक प्रयोग करुन विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचवलं." , असं बच्चू कडू म्हणाले.
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार (Maha Vikas Aghadi) येऊन जवळपास अडीच वर्ष पूर्ण झाली आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील हे सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक घोषणा केल्या गेल्या, सोबतच विकासकामांचे दावे देखील केले गेले. परंतु, सामान्य माणसांचे प्रश्न कुठंतही मागे राहिल्याचं चित्र आहे. महागाई, रोजगार, शेतीसमोरील आव्हानं, उद्योगातील समस्या असे अनेक सवाल सामान्य माणसांसमोर उभे ठाकले आहेत. याच निमित्तानं आज एबीपी माझानं 'प्रश्न महाराष्ट्राचे' हा कार्यक्रम आयोजित केला. यात मुंबई, विदर्भ, मराठवाडा, कोकण, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्र अशा सर्व भागांतून सामान्य नागरिकांचे सवाल उत्तरदायी असलेल्या नेत्यांना आणि मंत्र्यांना विचारण्यात येणार आहेत.
राज्यातील दिग्गज नेते आणि मंत्र्यांचा सहभाग
या कार्यक्रमात सकाळी 10 वाजता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सहभाग घेतील. त्यांच्याशी कायदा सुव्यवस्था विषयावर संवाद होणार आहे. तर 11 वाजता शालेय शिक्षण व्यवस्थेवर राज्यमंत्री बच्चू कडू हे सहभाग घेणार आहेत. 12 वाजता कृषीसंदर्भातील प्रश्नांवर राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांच्याशी संवाद साधला जाईल.
दुपारी एक वाजता भाजप नेते आमदार आशिष शेलार यांच्याशी संवाद साधला जाणार आहे. तर दुपारी 2 वाजता मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याशी गृहनिर्माण संबंधी प्रश्नावर चर्चा होणार आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ दुपारी तीन वाजता या कार्यक्रमात भाग घेतील तर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे सायंकाळी 4 वाजता प्रश्नांची उत्तरं देतील.
भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील 4.30 वाजता या कार्यक्रमात सहभागी होतील तर महसूल संबंधी प्रश्नांवर बोलण्यासाठी मंत्री बाळासाहेब थोरात हे 5 वाजता कार्यक्रमात सहभागी होतील.
कुठे पाहाल कार्यक्रम
हा सर्व कार्यक्रम आपण आज दिवसभर एबीपी माझा चॅनलवर पाहू शकणार आहोत. तसेच एबीपी माझाच्या यू ट्यूब चॅनेलवर दिवसभर या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण होईल. सोबतच एबीपी माझाच्या वेबसाईट, फेसबुक, ट्विटरवरही कार्यक्रमाचे अपडेट्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत.