Dr. Prakash Amte : ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश बाबा आमटे (Dr. Prakash Amte) यांच्या तब्येतीसंदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सध्या यांच्या प्रकृतीमध्ये  सुधारणा झाली आहे. त्यामुळे चाहत्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला  दिलासा मिळाला आहे. प्रकृतीसंदर्भातील माहिती मुलगा डॉ. अनिकेत आमटे (Aniket Amte) यांनी फेसबुक पोस्टच्या (Facebook Post) माध्यमातून दिली आहे.


गेली अडीच महिने पुण्यात दीनानाथ मंगेशकर रुग्णालय (Dinanath Mangeshkar Hospital) येथे कॅन्सरवरील उपचार घेऊन आता बाबांची तब्येत आता सुधारली आहे.  केमोथेरपीने काम केले आहे. आज हाताचे प्लॅस्टर काढले. केमोथेरपी सुरू असतानाच खोलीत अडखळून पडल्याने मनगट फ्रॅक्चर झाले होते. त्याला आज दीड महिना झाला म्हणून प्लॅस्टर काढले. आज दवाखान्यात डॉक्टरांनी फॉलोअपसाठी बोलावले होते. समाधानकारक सुधारणा असल्याने येत्या शुक्रवारी डॉक्टरांनी नागपूरला जायची परवानगी दिली आहे. 


डॉ. अनिकेत आमटे म्हणाले, काही दिवस त्यांच्यासाठी आणि आमच्यासाठी अतिशय खडतर गेले. दोन महिने सलग ताप आणि न्युमोनियामुळे नऊ किलो वजन कमी झाले आहे.  कॅन्सरसारखा भयंकर आजार कोणालाही होऊ नये अशी निसर्गाला प्रार्थना करतो. दीनानाथ रुग्णालयामधील डॉक्टरांचे अथक प्रयत्न आणि स्टाफ यांनी केलेली सेवा आणि आपल्या सर्वांच्या शुभेच्छा यामुळे बाबा बरे होत आहेत. कुठल्याही इन्फेक्शनचा धोका होऊ नये म्हणून सध्या गर्दी टाळावी असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. पुढील काही दिवसांनी डॉक्टरांच्या परवानगीने बाबांना सर्वांना भेटता येणार आहे.


आदिवासींना मुख्य प्रवाहात आणावं, त्यांची पिळवणूक थांबावी आणि त्यांना माणूस म्हणून जगण्याची संधी मिळावी डॉ. प्रकाश आमटे यांनी त्यांच्या हेमलकसाच्या ‘लोकबिरादरी प्रकल्पा’तून अनेक वर्षे करत आहेत. त्यांच्या या कार्यात त्यांची पत्नी डॉ. मंदाताई देखील सामील झाल्या. आमटे कुटुंबियांची चौथी पीढी या प्रकल्पाच्या माध्यमातून आदिवासींना सेवा देत आहेत. 1973 साली सुरू झालेल्या प्राण्यांच्या अनाथालयाला 1991 मध्ये रेस्क्यू सेंटरची मान्यता मिळाली. जंगली प्राणी आणि माणूस यांच्यात वेगळं नातं जपणारं ठिकाण म्हणून हे 'आमटे आर्क' प्रसिद्ध आहे. सामाजिक कार्यासाठी ‘रेमन मॅगसेसे’ (Ramon Magsaysay) हा जागतिक पातळीवरचा पुरस्कार डॉ. प्रकाश आमटे यांना देण्यात आला आहे. दुर्गम भागात गेली चार दशकं सुरु असलेल्या नि:स्वार्थ कामाची ही ओळख संस्मरणीय तर ठरतेच पण आबालवृद्धांना प्रेरणाही देते.