नागपूर : राज्यात भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडीकडून रणनीती सुरु असतानाच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar on Mahavikas Aghadi) यांच्याशी सुद्धा बोलणी सुरु आहेत. मात्र, वंचितकडून अटींवर अटी आणि भूमिका पाहता प्रकाश आंबेडकरांना नेमकं काय म्हणायचं आहे आणि जे म्हणायचं आहे? अशी विचारणा करण्याची वेळ आली आहे. आता त्यांनी पुन्हा एकदा 'इशारा एक्स्प्रेस'चा वेग वाढला आहे. आंबेडकर यांनी जागावाटपावरून अजूनही समाधानी नसल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. 


महाविकास आघाडीचं स्वरूप कसं राहील? याचं उत्तर माझ्याकडे नाही. त्याचं उत्तर मविआच्या सर्व पक्षांकडे आहे. प्रत्येक पक्षाने एकत्रित लढायचं आहे की वेगवेगळं लढायचं आहे हे आधी ठरवले पाहिजे, अशी भूमिका मांडली आहे. मविआला एकत्र लढायचे असेल, तर सर्वांनी त्या विचारला चिकटून राहिलं पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.  


महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात कोणीही मोठा नाही. म्हणून मोठ्या भावाचा पवित्रा मागे ठेवला पाहिजे. आपली चादर पाहून जागांची मागणी केली पाहिजे. जेव्हा आमची मविआ सोबत चर्चा सुरू नव्हती तेव्हा प्रत्येक पक्षाला 12 जागांची मागणी केली होती. काँग्रेसने 24 तर शिवसेनेने 23 जागांची मागणी केली आहे. दोघेही त्यावर अडून बसली तर चर्चा कशी पुढे जाईल? यामध्येच 47 जागा गेल्या. त्यामुळे प्रत्येकाने आपली चादर पाहून जागांची मागणी करावी, असे म्हणाले. 


मोठा भाऊ राजकारणात योग्य नाही 


ते म्हणाले राजकारणात मोठा भाऊ असल्याचे वर्तन (Big brother attitude) राजकारणात योग्य नाही, असा पवित्रा नुकसान करणारा असतो. आज कोणीही म्हणू शकत नाही की आम्हीच जिंकू. म्हणून आम्ही म्हणतो आमच्याकडे मुस्लिम वगळून अडीच लाख मते आहेत. त्यामध्ये आम्ही 5 लाखांपर्यंत गेलो तर आम्ही विजयी होऊ. वक्तव्य जर बोचणारी नसतील तर जमलेली माणसं एक व्हायला वेळ लागत नाही.


एक कॉमन मिनिमम प्रोग्राम तयार करावा 


आंबेडकरर यांनी सांगितले की, 1977 मध्ये विरोधकांची झालेली एकी पाहता आम्ही किमान समान कार्यक्रमाची आमची मागणी आहे. आता त्याची जबाबदारी काँग्रेसने घेतली आहे.. आम्ही उद्यापर्यंत किमान समान कार्यक्रमासाठी आमचे मुद्दे देऊ. त्यानंतर काँग्रेसने सर्व पक्षांचा एक किमान समान कार्यक्रम करावा, अशी त्यांची जबाबदारी आहे. 


मुस्लिम वगळून आमच्याकडे अडीच लाख मतदान आहे. मागील लोकसभा निवडणुकीत आम्हाला राज्यभरात 60 लाख मतं मिळाली होती. आज व्यापारी मोदी-मोदी करत आहे. मात्र, त्यांनी लक्षात ठेवावं पुढील कार्यकाळात मोदी मोठ्या कंपन्यांचे फायद्यासाठी व्यापाऱ्यांना नष्ट करेल. जसं वाघाला माणसाच्या रक्ताची सवय लागली, तर तो तो इतर जनावरांचा शिकार करत नाही तशीच सवय मोदींना लागली आहे.


आम्हाला सर्व 48 जागांवर निवडणूक लढवायची आहे. मात्र, सध्या मविआसोबत आमची चर्चा सुरू आहे. म्हणून आम्ही आमची ती मोहीम काही वेळ बाजूला ठेवली आहे. मुस्लिमांनी एकसंघपणे मतदान केलं पाहिजे. ज्याला भाजपविरोधात सर्वाधिक मतदान मिळण्याची शक्यता आहे त्याला मतदान करा, असेही ते म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या