नागपूर : सध्याच्या राजकीय परिस्थितीवर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) नेते प्रफुल पटेल (Praful Patel) यांनी मोठे गौप्यस्फोट केलेत.भाजपने आमच्याशी चर्चा करून ठरवलं होतं की एक महिना राष्ट्रपती शासन लागल्यानंतर आपण एकत्रित येऊ आणि सरकार स्थापन करू असा गौप्यस्फोट प्रफुल पटेल यांनी केलाय. तर एकदा मोदी प्रचंड बहुमताने देशाचे सत्तेवर पुन्हा आल्यानंतर त्याचे परिणाम महाराष्ट्राच्या विधानसभेवर होणारच आहे. त्यावेळी पाहू कोण आमच्या सोबत यायला तयार होतं, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांनी व्यक्त केलाय. ते एबीपी माझाशी बोलत होते.
प्रफुल पटेल म्हणाले, एकदा मोदी प्रचंड बहुमताने देशाच्या सत्तेवर पुन्हा आल्यानंतर त्याचे परिणाम महाराष्ट्राच्या विधानसभेवर होणारच आहे. त्यावेळी पाहू कोण आमच्या सोबत यायला तयार होते. राजकारणात दार उघडे ठेवावच लागतात आणि आमचे दार उघडे आहे. तेव्हा (4 जून नंतर लोकसभा निकालानंतर) कोणी येऊ इच्छित असेल तर जरूर विचार करता येईल त्याला सन्मानाने आम्ही घेऊ.
2019 मध्ये आम्ही भाजप आणि सेना दोन्हीकडे चर्चा करत होतो: प्रफुल पटेल
2014 मध्ये आम्ही भाजपला पाठिंबा दिला होता. 2017 मध्ये परत तसे प्रयत्न झाले.2019 मध्ये तर अजित दादांनी फडणवीसन सोबत शपथ घेतली होती. तेव्हा भाजपने आमच्याशी चर्चा करून ठरवलं होतं की, एक महिना राष्ट्रपती शासन लागल्यानंतर आपण एकत्रित येऊ आणि सरकार स्थापन करू. तेव्हा उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाण्याचा काही प्रश्नच नव्हता. मात्र एका महिन्यात चर्चा होऊन आम्ही वेगळ्या मार्गावर गेलो म्हणून मी म्हणालो की आम्ही भाजप सोबत आधीच यायला हवं होतं. 2014 पासूनच एकत्रित यायला हवं होतं..जर 2019 मध्ये आम्हाला शिवसेनेसोबत जायचं होतं.. तर आम्ही भाजप सोबत चर्चा करायला नको होतं. मात्र आम्ही दोन्हीकडे चर्चा करत होतो, असे प्रफुल पटेल म्हणाले.
शरद पवार भविष्यात तुमच्यासोबत येतील का?
शरद पवार भविष्यात तुमच्यासोबत येतील का? या प्रश्नाला उत्तर देताना प्रफुल पटेल म्हणाले, शरद पवार नेहमीच सन्माननीय नेते आहे आणि राहणार आहे. आमची इच्छा होतीच की शरद पवार आमच्या सोबत राहिले पाहिजे. दोन जुलैला अजित पवार आणि इतर मंत्र्यांची शपथ झाल्यानंतरही आम्ही दोन वेळेला प्रयत्न केले त्यांचे पाय पडून आशीर्वाद मागितले. तुम्ही आमच्या सोबत राहायला पाहिजे असं सांगितलं. त्यानंतर आम्ही एक निर्णायक राजकीय दिशा घेतली. मात्र शरद पवारांना त्या संदर्भात अंतिम निर्णय घेण्यासाठी बहुतेक काही संकोच होता.
काही जागा आम्हाला मिळाव्यात : प्रफुल पटेल
महायुतीतील जागावाटपाच्या तिढ्यावर बोलताना प्रफुल पटेल म्हणाले, महायुतीत आम्ही आल्यानंतर काही जागांचा (नाशिक, सातारा) प्रश्न निर्माण झाला आहे. भाजपच्या 24 जिंकलेल्या जागा आहे एकनाथ शिंदे यांच्या 13 जिंकलेल्या जागा आहेत त्या संदर्भात कुठला वाद नाही. आमच्या पारंपरिक चार जागा आहे. त्याबद्दलही कुठलाही वाद नाही. मात्र त्यापेक्षा जास्त ज्या जागा आम्ही घेऊ इच्छितो, तिथे आमचे संघटन आहे. आमची ताकद आहे, आमचे आमदार आहेत. तिथे आम्ही चांगली लढत देऊ शकतो. त्या जागेची आमची मागणी आहे.
नाशिक- साताऱ्याच्या जागेवर एक दोन दिवसात निर्णय : प्रफुल पटेल
नाशिक आणि साताऱ्याच्या जागेविषयी बोलताना प्रफुल पटेल म्हणाले, नाशिक जरी एकनाथ शिंदे यांची जागा आहे मात्र त्यांनी एक जागा कमी घेण्यास मान्य केले आणि भाजपने तयारी दाखवली तर आम्हाला बरं वाटेल. नाशिकमध्ये उमेदवार कोण राहील, याची चर्चा झालेली नाही. एकदा सीट फायनल झाली की उमेदवारीबद्दल चर्चा करू. काही लोकं मात्र जागा कुणाची हे निश्चित होण्याच्या आधीच उड्या मारायला लागतात. कार्यक्रम करून टाकू अशा धमक्या देतात. नाशिकची जागा आम्ही नक्कीच मागतोय. तिथे कोणाला उभे करायचे तो आमचा पक्षांतर्गत विषय आहे. आधी नाशिकची जागा आम्हाला मिळायला हवी अशी चर्चा सुरू आहे. साताऱ्यामध्ये आधीपासूनच राष्ट्रवादीचा संघटन आहे, ताकद आहे. सुरुवातीला तो जिल्हा नेहमी शरद पवार यांच्यासोबत राहिला आहे.साताऱ्यात अजित पवारांनाही मानणारा मोठा वर्ग आहे. साताऱ्याची जागा आम्हाला मिळाली पाहिजे अशी आमची मागणी आहे.. एक-दोन दिवसात त्याबद्दलही निर्णय होईल.
बारामतीतील लढाई राजकीय : प्रफुल पटेल
बारामती पवार वि. पवार या निवडणुकीविषयी बोलताना प्रफुल पटेल म्हणाले, बारामती संवेदनशील मतदारसंघ झाला आहे. बारामतीची ओळख शरद पवारांशी जोडलेली आहे. मात्र अजित पवार हे 35 वर्षापासून बारामतीचे विकासासाठी कार्यरत आहेत. त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. त्यामुळे बारामती मध्ये अजित पवारांच्या आयडेंटिटीला ही आपण नजर अंदाज करू शकत नाही. सुरुवातीला शरद पवारांचे वजन तिथे होते. आजही अस्तित्व आहे. मात्र अजित पवार यांनीही बारामतीमध्ये आपले तुल्यबळ वेगळे स्थान निर्माण केले आहे. बारामतीमध्ये राजकीय लढाई आहे. ती व्यक्तिगत किंवा कौटुंबीक लढाई नाही. ती काही संपत्तीची लढाई नाही..त्यामुळे बारामतीची लढाई कुटुंब बाजूला ठेवून राजकीय दृष्टिकोनातून लढवली गेली, तर हे सर्व टाळता येऊ शकतं.
हे ही वाचा :