Pradhan Mantri Rashtriya Bal Puraskar: भारत सरकार कडून आज 2021 चा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार  जाहीर करण्यात आलाय. भारतातील निवड झालेल्या राष्ट्रीय बालपुरस्कार विजेत्यांशी नरेंद्र मोदींनी संवाद साधत त्यांना पुरस्कार प्रदान केलाय. समाजसेवा, शैक्षणिक, क्रीडा, कला, संस्कृती आणि शौर्यता दाखवणाऱ्या 5 ते 18 वर्षांखालील मुलांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार दिला जातो. तसेच प्रत्येक विजेत्याला पदक, रोख एक लाख रुपये आणि प्रमाणपत्र दिलं जातं. दरम्यान, नांदेडचा (Nanded) जिल्ह्याच्या कंधार (Kandhar) तालुक्यातील घोडज येथील कामेश्वर जगन्नाथ वाघमारे (Kameshwar Waghmare) याचीही या पुरस्कारासाठी निवड झालीय. 


कामेश्वर वाघमारे यानं फ्रेब्रुवारी 2020 मध्ये कंधार तालुक्यातील घोडज गावा शेजारी वाहणाऱ्या मन्याड नदी पात्रात बुडणाऱ्या तीन बालकांचा जीव वाचवला होता. पोहण्यासाठी गेले असताना पाण्याचा अंदाज न आल्यानं तिन्ही बालक पाण्यात बुडत होती. त्यावेळी मंदिरा शेजारी बसलेल्या कामेश्वरला ही गोष्ट लक्षात आली. त्यानं आपल्या जीवाची पर्वा न करता नदी प्रवाहात उडी घेतली आणि दोन मुलांना नदीतून बाहेर काढले. त्यानं तिसऱ्या मुलालाही वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु, उशीर झाल्यानं त्याचा त्याचा जीव वाचवू शकला नाही. 


मोदींकडून कौतूक
दरम्यान आठव्या इयत्तेत शिकणाऱ्या कामेश्वर वाघमारेच्या धाडशी कार्याबद्दल त्याला भारत सरकार कडून आज 2021 चा राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार जाहीर करण्यात आला. या कामगिरीबाबत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही त्याचं कौतूक केलं. 


कामेश्वरचं जिल्हाधिकारी होण्याचं स्वप्न
कामेश्वरच्या माध्यमातून जिल्ह्यातील बालकांचा एक प्रकारे गौरव झाला असून याबद्दल कामेश्वरचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे. उच्चशिक्षण घेऊन जिल्हाधिकारी होण्याची व जिल्ह्याची सेवा करण्याची भावना कामेश्वरनं व्यक्त केलीय. त्याच्या पुढील शिक्षणाचा खर्च सरकारनं उचलून त्यास नोकरीत घेण्याची मागणी कामेश्वर वाघमारेच्या पालकांनी केलीय.


उपमुख्यमंत्र्यांकडून कौतूकाची थाप
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही महाराष्ट्रातील ज्या बालकांनी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्राप्त केलाय, त्यांचं कौतूक केलंय. महाराष्ट्राच्या बालकांनी ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारा’चे मानकरी ठरताना प्रत्येक क्षेत्रात आपलं कर्तृत्व सिद्ध केलं आहे. या पुरस्कार विजेत्या बालकांमुळं महाराष्ट्राचा सन्मान वाढला आहे. या बालकांच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या त्यांच्या पालकांचे, शिक्षकांचे, नातेवाईकांचे, मार्गदर्शकांचे, हितचिंतकांचेही उपमुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केलंय.


(एबीपी माझाकडून प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार जाहीर झालेल्या सर्व बालकांचे अभिनंदन)


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha