Dr. Pradip Kurulkar : भारताची क्षेपणास्त्र मोहीम, भारताचा आण्विक ऊर्जा कार्यक्रम, भारतीय सैन्य दलांना उपयुक्त ठरणारं वेगवेगळ्या प्रकारचं तंत्रज्ञान यांसारख्या अतिशय संवेदनशील मोहिमांचा भाग असलेले डीआरडीओचे संचालक डॉक्टर प्रदीप कुरुलकर (Pradip kurulkar) हनी ट्रॅपच्या जाळ्यात अलगदपणे अडकत गेले. पाकिस्तानकडून गेली काही वर्षं भारतीय सैन्यदलातील अधिकारी, जवान आणि शास्त्रज्ञांसाठी पद्धतशीरपणे हनी ट्रॅपच जाळं विणण्यात येतं आहे. त्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या व्यक्तीच्या आवडी निवडीची माहिती काढून सावज हेरलं जातं. प्रदीप कुरुलकर यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याआधी त्यांच्या वर्तवणुकीचा अभ्यास करण्यात आला होता. 


एटीएस कोठडी संपल्याने आज कुरुलकरांना पुणे सत्र न्यायालयात हजर केलं असता त्यांनी कोणती संवेदनशील माहिती शत्रूराष्ट्राला पुरवलीय याचा तपास करण्यासाठी त्यांची कोठडी वाढवून देण्याची मागणी एटीएसकडून करण्यात आली. न्यायालयाने ती मान्य करत कुरुलकर यांच्या कोठडीत 15 मेपर्यंत वाढ करण्यात  आली आहे.
 
पाकिस्तान सोबतचं युद्ध जेवढं प्रत्यक्ष युद्धभूमीवर लढलं जातंय तेवढंच ते सायबर क्राईमच्या माध्यमातून सोशल मीडियावरही लढलं जात आहे. भारतीय सैन्यदलातील अधिकारी, जवान आणि शास्त्रज्ञ यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्यांच्याकडून संवेदनशील माहिती काढून घेण्यासाठी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांकडून सातत्यानं हनी ट्रॅपचा उपयोग केला जात आहे. गेल्या काही वर्षांमध्ये लष्करातील अनेक बडे अधिकारी, जवान आणि शास्त्रज्ञ या हनी ट्रॅपची शिकार बनलेत. त्यामध्ये आता प्रदीप कुरुलकरांचा समावेश झाला आहे. गेल्या काही वर्षातील हनी ट्रॅपच्या घटना पाहता भारतीय सैन्यदलांसमोरील आव्हान मोठं असल्याचं लक्षात येतं. 


कोणाला हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकवलं?


- 2012साली वायुदलात लिडिग एअर क्राफ्ट्समन म्हणून काम करणाऱ्या के. के. रणजित या अधिकाऱ्याला हनी ट्रॅपमध्ये अडकल्याबद्दल अटक करण्यात आली . 
- 2015 ते 2017 या दोन वर्षांमध्ये लष्करातील पाच जवान आणि अधिकारी वेगवगेळ्या घटनांमध्ये हनी ट्रॅपचा शिकार बनले . 
- 2018 मध्ये रोहतकमधे तैनात असलेल्या जवानाने सैन्य भरतीच्या 18 सेंटर्सचे फोटो काढून पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांना पाठवल्याचं उघड झाल्यावर त्याला अटक करण्यात आली . 
- 2019 साली बिचित्र बेहरा या जवानाला राजस्थानमधील पोखरणमध्ये हनी ट्रॅपमध्ये अडकल्याबद्दल अटक करण्यात आली. 
- 2020 सप्टेंबरमध्येमध्ये दिल्ली डीआरडीओमध्ये काम करणाऱ्या शास्त्रज्ञाचे हनी ट्रॅपमध्ये अडकवून अपहरण करण्यात आलं. 
- 2022 जुलैमध्ये प्रदीप कुमार प्रजापती या जवानाला राजस्थान पोलिसांनी हनी ट्रॅपमध्ये अडकून पाकिस्तानला संवेदनशील माहिती दिल्याबद्दल अटक केली. 


... म्हणून जवानांना सोशल मीडियावर बंधन


हनी ट्रॅपचा धोका ओळखून भारत सरकारने सैन्यदलातील जवानांना सोशल मीडियाचा वापर करण्यावर बंधन घातली. फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोबतच 89 अॅपचा वापर करण्यास मनाई करण्यात आली. यामध्ये प्रामुख्यानं डेटिंग अॅपचा समावेश आहे. डीआरडीओसारख्या महत्वाच्या संस्थेत अँड्रॉइड फोन वापरण्यास तर मज्जावच आहे. मात्र तरीही अनेकजण चोरून याचा वापर करतात. प्रदीप कुरुलकर देखील हेच करत होते. त्यानंतर झारा दास गुप्ता या बनावट नावाने कुरुलकर यांच्याशी संपर्क साधण्यात आला आणि त्यांना जाळ्यात ओढण्यात आलं. त्यासाठी प्रदीप कुरुलकर यांची महिलांसोबतची वागणूक आणि सोशल मीडियावरील वावर याचा अभ्यास करण्यात आला. 


हा अधिकारी जाळ्यात कसा अडकतो?


त्या अधिकाऱ्याला किंवा जवानाला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याआधी त्याच्या आवडी - निवडी आणि वर्तणुकीची माहिती काढली जाते. त्यानंतर आधी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या व्यक्तीशी बनावट नावाने संपर्क करण्यात येतो आणि त्यानंतर पर्सनल चॅटिंग सुरु करून त्या व्यक्तीला जाळ्यात अडकवण्यात येतं. प्रदीप कुरुलकर यांना जाळ्यात ओढण्याआधी त्यांची ही सगळी माहिती काढण्यात आली होती. कुरुलकरांच्या यांच्या स्वभाव वैशिष्ठ्यांचा उपयोग करून  हनी ट्रॅपच जाळं आणखी घट्ट करण्यात आलं होतं.