मुंबई : देशात सध्या कोरोना महामारीचं संकट गडद होताना दिसत आहे. यात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. या संकटाचा सामना करण्यात सर्व डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचारी आघाडीवर आहेत. यातच मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने एमडी आणि एमएसच्या (MD-MS Exam) परीक्षा 30 जुलैच्या आधी करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी ही परीक्षा स्थगित करण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पत्र लिहिलं आहे. यात भारत सरकारकडून मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाला डिसेंबर 2020 पर्यंत परीक्षा स्थगित करण्याची विनंती केली जावी, असं म्हटलं आहे. पत्रात म्हटलं आहे की, अंतिम वर्षातील एमडी एमएसचे अनेक विद्यार्थी निवासी डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत. ते सध्या महाराष्ट्र सरकार आणि महानगरपालिका दवाखाने तसेच वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कोविड -19 रुग्णांवर उपचारासाठी तसेच क्लिनिकल व्यवस्थापनास मदत करण्यात आघाडीवर आहेत. जर त्यांच्या परीक्षा वेळापत्रकानुसार घेण्यात आल्या तर या अत्यंत महत्त्वाच्या काळात प्रशिक्षित डॉक्टरांची कमतरता भासेल, असे पत्रात म्हटले आहे.
वैद्यकीय परीक्षा 15 जुलैपासूनच सुरु होणार, विद्यार्थ्यांना गावात परीक्षा देण्याची मुभा केंद्रीय परिषदांनी दिलेल्या निर्देशानुसार आणि विद्यापीठ परीक्षा मंडळाच्या ठरावानुसार उन्हाळी 2020 वैद्यकीय परीक्षा 15 जुलैपासून घेण्याचे (प्रथम वर्ष वैद्यकीय अभ्यासक्रम 2019 वगळून) विद्यापीठाने जाहीर केले आहे. आयसीएसई बोर्डाच्या परीक्षा यंदा घेता येणार नाहीत, राज्य सरकारची हायकोर्टात भूमिका राज्य सरकारने याआधीच विद्यापीठाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या अंतिम वर्षाच्या/अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. पण ज्यांना  परीक्षा द्यायच्या आहेत, त्यांनी विद्यापीठाकडे लेखी स्वरूपात द्यावे, त्या परीक्षा घेण्याबाबत कोविड-19 प्रादुर्भावाचा अंदाज घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले आहे. त्यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. तर दुसरीकडे राज्यातील कोरोनाचं वाढतं संकट पाहता आयसीएसईच्या दहावी आणि बारावीच्या प्रलंबित परीक्षा जुलै महिन्यात घेण्यास महाराष्ट्रात परवानगी दिली जाणार नाही,अशी भूमिका काल, बुधवारी राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात मांडली आहे. कोरोना रुग्णांच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य देशात आघाडीवर आहे. कालपर्यंत पाठविण्यात आलेल्या 8,23,775 नमुन्यांपैकी 1,42,900 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5,57,948 लोक होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 33,581 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 73792 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 51.64 % एवढे झाले आहे. राज्यात कालपर्यंतच्या आकडेवारीनुसार 62354 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.