मुंबई : संजय कुमार यांची राज्याच्या नव्या मुख्य सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर विद्यमान मुख्य सचिव अजोय मेहता यांची मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. अजोय मेहता 30 जून रोजी सेवानिवृत्त होत असून त्यानंतर संजय कुमार सूत्रे स्वीकारतील. तर 1 जुलैला अजोय मेहता मुख्ययमंत्र्यांचे प्रधान सल्लागार म्हणून सूत्र हाती घेतील.
अजोय मेहता यांना यापूर्वी दोनदा मुदतवाढ देण्यात आली होती. सप्टेंबर 2019 रोजी पहिल्यांदा सहा महिने आणि दुसऱ्यांदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तीन महिन्याची मुदत वाढ देण्यात आली होती. त्यामुळे अजोय मेहता यांना तिसऱ्यांदा मुदतवाढ मिळेल अशी चर्चा होती. मात्र त्यांना मुदतवाढ मिळाली नसली तरी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार म्हणून त्यांची प्रशासनावरची पकड कायम असणार आहे हे त्यांच्या कमबॅकमुळे स्पष्ट झालं आहे.
विशेष म्हणजे काँग्रेस - राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी अजोय मेहता यांच्याविरोधात उघड नाराजी व्यक्त केली असतांना मुख्यमंत्र्यांनी मेहता यांना विशेष सल्लागार पदी नेमण्याचा निर्णय घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. इतकंच नव्हे तर अजोय मेहता यांना मुख्यमंत्री सचिवालयात 603 क्रमांकाचे दालन व मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आता त्यांच्यावर प्रामुख्याने कोविडच्या पा्र्श्वभूमीवर आर्थिक व प्रशासकीय यंत्रणा वेगाने कार्यान्वित करण्याची तसेच नव्या औद्योगिक गुंतवणुकीला चालना देण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
खरंतर अजोय मेहता यांनी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त पदावर चार वर्षे काम केले आहे. तेव्हापासून अजोय मेहता उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू अधिकारी मानले जातात. त्यात कोरोनाच्या संकटकाळात मुख्य सचिव म्हणून मेहता यांनी पहिल्यांदाच मुख्यमंत्री पद स्वीकारलेल्या उद्धव ठाकरे यांची खंबीरपणे साथ दिली. मागच्या तीन महिन्यात राज्याच्या प्रत्येक निर्णय प्रक्रियेत उद्धव ठाकरे यांना पडद्यामागून मार्गदर्शन करण्याचे काम चोख बजावले. वेळप्रसंगी इतर अधिकारी आणि काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांचा रोषही ओढावला. यामुळे उद्धव ठाकरेंनी अजोय मेहता यांना मुदतवाढ मिळावी यासाठी विशेष प्रयत्न केल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र तांत्रिकदृष्ट्या मुदतवाढ मिळणं शक्य नसल्याने उद्धव ठाकरे यांनी अनेकांचा विरोध डावलून मेहता यांच्यासाठी विशेष सल्लागार पदाची तरतूद केली.
नेमकी का होती अजोय मेहता यांच्याविरोधात नाराजी ?
सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना मदत पुनर्वसन खात्यातील सचिव पदावरचे अधिकारी त्यांच्या खात्यात हवे होते. मात्र तांत्रिकदृष्ट्या या पदासाठी ते योग्य उमेदवार नसल्याचं अजोय मेहता यांनी निदर्शनास आणून दिले. त्यामुळे मर्जीच्या अधिकाऱ्याच्या बदलीचा प्रस्ताव मंजूर करण्यास टाळाटाळ केल्याने अजोय मेहता यांच्याबाबत अशोक चव्हाण नाराज असल्याची चर्चा होती. याबाबत अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चाही केली होती. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही.
तर एकदा मंत्रिमंडळ बैठकीत अजोय मेहता यांनी अन्न व नागरी पुरवठा विभागाचा प्रस्ताव आणला. त्या विभागाचे मंत्री छगन भुजबळ यांनी या प्रस्तावाला आक्षेप घेत याबाबत मंत्री म्हणून कुठलीही पूर्वकल्पना नसल्याचं स्पष्ट केलं. यामुळे भुजबळ यांनी मंत्रिमंडळात नाराजी व्यक्त केली होती. त्यांची री ओढत अशोक चव्हाण आणि इतर मंत्र्यांनीही अजोय मेहता यांना धारेवर धरलं होतं.
तसेच मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्यासोबत अजोय मेहता यांची कोरोनाच्या उपाय योजनांसंदर्भात अनेकदा मतभेद झाल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यांच्यातला वाद टोकाला गेल्यामुळेच प्रवीण परदेशी यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याची चर्चा आहे.
अजोय मेहता यांना कोरोनाच्या कारणामुळे दुसऱ्यांदा मुदतवाढ मिळाल्यामुळे मुख्य सचिव पदाच्या शर्यतीत असलेले अनेक अधिकारीही नाराज होते. मेहता यांच्यामुळे त्यांची संधी हुकण्याची चिंता या अधिकाऱ्यांना होती.
त्यामुळे अजोय मेहता यांच्याविरोधात वातावरण चांगलंच तापलं होतं. मात्र तरीही अजोय मेहता यांनी शर्यतीत असलेल्या प्रवीण परदेशी आणि सीताराम कुंटे यांचा पत्ता कट करत संजय कुमार यांची शिफारस मुख्य सचिव पदासाठी केली. संजय कुमार आणि अजोय मेहता बॅचमेट असून ते चांगले मित्र असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे संजय कुमार यांची मुख्य सचिव पदी वर्णी लागली असली तरी खऱ्या अर्थाने प्रशासकीय यंत्रणेचा सुकाणू अजोय मेहता यांच्याच हाती असेल यात शंका नाही.
Ajoy Mehta EXCLUSIVE कसा लढतोय महाराष्ट्र? अजॉय मेहता यांची सर्वात मोठी मुलाखत!