Pooja Khedkar Update News : बडतर्फ ट्रेनी IAS अधिकारी पूजा खेडकरने (Pooja Khedkar) अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ज्या कंपनीचा पत्ता वापरला, त्या थर्मोव्हेरिटा इंजिनिअरिंग कंपनीचा (ThermoVerita Engineering Company) थकीत कर (tax arrears) अखेर खेडकर कुटुंबीयांनी अदा केला आहे. कंपनी सील केल्यानंतर 21 दिवसांमध्ये कर अदा न केल्यास मालमत्तेचा लिलाव केला जातो. या भीतीपोटी खेडकर कुटुंबीयांनी ही तत्परता दाखवली आहे. रोख रकमेच्या रुपात पिंपरी पालिकेचा (Pimpri Municipality) थकलेला कर अखेर अदा केला आहे.
दरम्यान, गेल्या तीन वर्षांचा 2 लाख 87 हजार 591 रुपयांचा मालमत्ता कर तर 1 लाख 78 हजार 680 रुपयांची पाणीपट्टी रोख स्वरुपात भरली आहे. खेडकर कुटुंबीयांनी किमान कंपनीच्या लिलावाची कारवाई तरी रोखली आहे.
कर थकवल्यानं कंपनीला ठोकले होते सील
थर्मोव्हेरिटा इंजिनिअरिंग कंपनी ही विवादीत IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या कुटुंबियांशी संबधित आहे. मागील महिन्यात या कपंनीला पिंपरी महापालिकेता कर थकवल्यानं कर संकलन व कर आकारणी विभागाच्या वतीनं सील ठोकले होते. तळवडे गावठाण, ज्योतीबानगर या ठिकाणी ही कंपनी आहे. मात्र, ही कंपनी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कंपनीकडून 2009 पासून व्यवसायिक कर भरला होता. शेवटचा कर हा 2022 मध्ये भरला होता. त्यानंतर या कंपनीने कर भरला नव्हता. कंपनीने 2 लाख 77 हजार 781 रुपयांचा कर थकवला होता. त्यामुळं मालमत्ता जप्त करण्याची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर खेडकर कुटुंबियांनी कर भरला आहे.
नेमकं प्रकरण काय?
पूजा दिलीप खेडकर या 2023 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी होत्या. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत त्यांनी 841 वा क्रमांक पटकावला होता. काही महिन्यापूर्वी सहायक जिल्हाधिकारी अधिकारी म्हणजेच प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून पुणे जिल्ह्यात त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. पण प्रशिक्षणाच्या काळातच पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडं अवास्तव मागण्या केल्यामुळं आणि अरेरावी वर्तनामुळं त्यांच्याबाबत प्रचंड चर्चा झाली. त्यानंतर तिथून वाशिम इथं बदली करण्यात आली होती. पूजा खेडकर यांनी दृष्टिदोष प्रवर्गातून UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आणि मानसिक आजाराचे प्रमाणपत्र सादर केले. याच आधारावर त्यांना विशेष सवलत मिळाली आणि त्या आयएएस झाल्या. त्यानंतर त्यांना सहावेळा वैद्यकीय तपासणीसाठी बोलवण्यात आलं. पण प्रत्येक वेळी त्या अनुपस्थित राहिल्या. तसेच पूजा खेडकर यांनी स्वतःच्या नावात, त्यांच्या वडिलांच्या नावात तसेच आईच्या नावात बदल करून केंद्रीय लोकसेवा आयोगाची फसवणूक केल्याचं या चौकशीत समोर आलं आहे. पूजा खेडकर यांनी परीक्षेचा फॉर्म भरत असताना फोटो, सही, ईमेल आयडी, मोबाईल नंबर आणि पत्ता बदलून परीक्षा देण्याची कमाल मर्यादा ओलांडली असल्याचं यूपीएससीने सांगितलं. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या:
Puja Khedkar: मोठी बातमी : पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी अखेर मोठं पाऊल उचललं, पूजा खेडकर यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा!