मुंबई : तुमचं मुंबईतील घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडाने तब्बल 2030 घरांची लॉटरी (Mhada) काढली असून विविध आरक्षणासह या घरांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. कमीत कमी 50 हजार आणि जास्तीत जास्त दीड लाख रुपये डिपॉझिट भरुन या घरांसाठी अर्ज करता येणार आहे. त्यामुळे, मुंबईतील म्हाडाच्या घरांच्या किंमतीही कोटींच्या घरात असल्याचं या जाहिरीतीवरुन दिसून येत आहे. मुंबईत (Mumbai) घर घेण्याचं सर्वसामान्य माणसांचं स्वप्न हे सध्यातरी महागच असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, मुंबईतील म्हाडाच्या घरासाठी निघणाऱ्या सोडतीमधील सर्वात कमी किंमतीचं घर 30 लाख रुपयांचं असून महागातील महाग घर (Home) 5 कोटींच्याही पुढे आहे. 


म्हाडाने 2030 घरांसाठी लॉटरीची जाहिरात प्रसिद्ध केली असून त्यामध्ये घरांच्या किंमतीही दिल्या आहेत. मुंबई शहरातील विविध भागातील ही घरं असून प्रत्येक ठिकाणच्या घराची किंमत वेगवेगळी आहे. त्यामध्ये, सर्वात कमी किंमतीतील घर हे जवळपास 30 लाख रुपयांचं असून सर्वाधिक किंमत असलेल्या घराची किंमत 7 कोटी आहे. ताडदेवमध्ये क्रिसेंट टॉवरमध्ये हे घर असून म्हाडातूनच यासाठी अर्ज करावा लागणार आहे.


कमी किंमतीची घरे 30 ते 50 लाख


म्हाडाच्या जाहिरातीनुसार, पीएमजीपी कॉलनी, मानखुर्द मुंबई येथील इमारतीत 210 स्क्वेअर फूट घराची किंमत तब्बल 29 लाख 37 हजार 266 रुपये एवढी आहे. तर, विक्रोळीतील घराची किंमत 35 लाख 81 हजार एवढी आहे. तसेच, विक्रोळीतील कत्रमवार नगर येथील 290 स्क्वेअर फूट घराची किंमत 38 लाख 11 हजार रुपये असून मुंबईतील अँटॉप हिल वडाळा, नुरा बझार, सीजीएस कॉलनीजवळील इमारातीमधील घराची किंमत ही सर्वात कमी आहे. येथील अंदाजे 290 स्वेअर फूटाच्या घरासाठी तब्बल 41 लाख 51 हजार रुपये मोजावे लागणार आहेत. तर, अल्प कोट्यातील काही घरांच्या किंमती 50 लाखांच्याही पुढे आहेत. 


ताडदेवमध्ये सात कोटींना घर 


म्हाडा सोडतीत असलेल्या घरांची किंमत अव्वाच्या सव्वा आहेत. मात्र, खासगी बिल्डरांनी उभारलेल्या घरांच्या तुलनेत म्हाडांच्या घरांची किंमत कमी आहेत. काही भागात म्हाडाच्या घरांची किंमत ही कोट्यवधी रुपये आहे. अँन्टॉप हिल येथे अत्यल्प गटासाठी 87 घरे आहेत. या घरांची किंमत 51 लाखांपर्यंत आहे. विक्रोळीमध्ये अल्प गटासाठी 88 घरे आहेत. या घरांची किंमत 67 लाख रुपये आहे. गोरेगावमध्ये मध्यम गटातील घरांची किंमत 1 कोटी 11 लाख रुपये आहे. ताडदेवमध्ये क्रिसेंट टॉवरमधील म्हाडाचे घर 7 कोटी रुपयांना आहे.


दरम्यान, प्रधानमंत्री आवास योजनेतील सदनिकांची किंमत ही केंद्र सरकार व राज्य शासनाचे एकूण अनुदान 2.5 लाख रुपये कमी करुन दर्शवण्यात आलेली आहे. 


घर घेण्यासाठी सर्वकाही ऑनलाईन 


म्हाडाच्या घरांच्या सोडतीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असणार आहे. त्यामुळे घर मिळवून देण्याचा दावा करणाऱ्यांवर विश्वास ठेवू नये, असे म्हाडातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. अर्जदाराची नोंदणी,आवश्यक कागदपत्रे सादर करणे, कागदपत्रांची पडताळणी करणे, अर्ज करणे, अनामत रकमेचा भरणा करणे या संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवली जाईल. विशेष म्हणजे यावेळी अर्जदारांची पात्रता ही सोडतीच्या अगोदरच निश्चित होणार आहे. त्यामुळे पात्र ठरलेले अर्जदारच सोडतीत सहभागी होऊ शकणार आहेत. 


4 सप्टेंबरपर्यंत करता येईल अर्ज


म्हाडाच्या सोडतीत भाग घ्यायचा असेल तर 4 सप्टेंबर दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे अनामत रक्कम स्वीकारण्याची अंतिम मुदत ही 4 सप्टेंबर रात्री 11.59 वाजेपर्यंत आहे. ज्या अर्जदारांनी याआधीच्या म्हाडाच्या घरांच्या सोडतीत सहभाग घेतलेला आहे तसेच ज्यांनी कागदपत्रे अपलोड करून नोंदणी केलेली आहे, त्यांना दरम्यानच्या काळात झालेल्या बदलांच्या नोंदी अपडेट करायच्या आहेत.  


हेही वाचा


कुख्यात गुंड हाजी सरवरचा गोळीबारात मृत्यू, शहर हादरलं; पोलिसांचा फौजफाटा तैनात