मुंबई : वनमंत्री संजय राठोड यांना आता राजीनामा देण्यास सांगितलं असल्याची माहिती शिवसेनेतील विश्वसनिय सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे अधिवेशनापूर्वी राठोड यांना राजीनामा द्यावा लागण्याची शक्यता आहे. संजय राठोड प्रकरणावरुन सरकारची नामुश्की झाल्यामुळे हा मोठा निर्णय होणार असल्याची माहिती शिवसेनेतील विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे.


संजय राठोड अधिवेशानपूर्वी राजीनामा देऊ शकतात, अशी माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. अशातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही संजय राठोड प्रकरणी एक सूचक वक्तव्य केलं होतं की, मुख्यमंत्री सर्व काही पाहत आहेत. आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेतील. त्यामुळे एकंदरीत मुख्यमंत्र्यांवर या प्रकरणामुळे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत.


पूजा चव्हाण आत्महत्येशी संबंधित संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपचे राज्यभर आंदोलन सुरु केलं असून भाजप महिला मोर्चा या प्रश्नावर अधिक आक्रमक झाल्याचं पहायला मिळालंय. संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा आणि त्यांच्यावर कारवाई करावी यासाठी भाजप आक्रमक झालं असून राज्यभरात चक्का जाम आंदोलन करण्यात आलं.


उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसते तर राठोडांना फाडून काढलं असतं, खुर्ची एवढी वाईट आहे का? चित्रा वाघ यांचा सवाल


काय आहे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण?


मूळची बीडमधल्या परळीची असलेल्या पूजा चव्हाण या 22 वर्षाच्या मुलीचा पुण्यातील राहत्या घरातून पडून 7 फेब्रुवारीला मृत्यू झाला. पूजाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय आहे. इंग्लिश स्पीकिंगच्या क्लाससाठी ती पुण्यात राहात होती. तिने इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केल्याचा संशय आहे. तिच्या आत्महत्येनंतर आत्महत्येशी विदर्भातील एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सुरु झाली होती. भाजपने तक्रार दाखल केली. शिवाय विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट पोलीस आयुक्तांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली. त्यातच पूजा चव्हाण आणि कथित मंत्र्यांच्या एक-दोन नव्हे तर तब्बल 12 ऑडिओ क्लिप समोर आल्या. त्यानंतर या ऑडिओ क्लिपमधील आवाज वनमंत्री संजय राठोड यांचाच असल्याचा दावा करत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राठोड यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :