मुंबई: पूजा चव्हाण आत्महत्येशी संबंधित संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपचे राज्यभर आंदोलन सुरु केलं असून भाजप महिला मोर्चा या प्रश्वावर अधिक आक्रमक झाल्याचं पहायला मिळालंय. संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा आणि त्यांच्यावर कारवाई करावी यासाठी भाजपच्या महिला मोर्चाने मुलुंड टोल नाक्यावर चक्का जाम आंदोलन केलं.
पूजा चव्हाण या 22 वर्षाच्या मुलीने आत्महत्या करुन आज वीस दिवस झाले तरीही या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. या प्रकरणात पोलिसांवर प्रचंड दबाव असल्याने त्यांनी गुन्हा दाखल केला नाही, त्यामुळे या तपासात अडचणी येत आहेत असा आरोप भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
संजय राठोड यांचा ताबडतोब राजीनामा घ्यावा. एखादा हिरो ज्या पद्धतीने वावरतो त्या प्रमाणे संजय राठोड मंदिरात जात आहेत, शक्तीप्रदर्शन करताना दिसत आहेत. त्यांना वाचवण्यासाठी महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांमध्ये चढाओढ सुरु असल्याचा आरोप भाजप महिला मोर्चाने केला आहे.
संजय राठोड यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी यासाठी औरंगाबाद भाजप महिला मोर्चाने मोठं आंदोलन केलं. त्यांनी यावेळी महाविकास आघाडी सरकारविरोधात घोषणाबाजी केल्या. या आंदोलनाच्यावेळी महिलांनी काळ्या साड्या परिधान करून राज्य सरकारविरोधात निषेध व्यक्त केला. या दरम्यान मोठा गोंधळ उडाला होता, त्यामुळे आंदोलनकर्त्या महिलांना पोलिसांनी काही काळासाठी ताब्यात घेतलं आणि नंतर सोडून दिलं.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात मंत्री संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा यासाठी कोल्हापुरात देखील भाजपाच्या महिला मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. कोल्हापूर शहरातील बिनखंबी गणेश मंदिर इथं हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जागे व्हा, शरद पवार जागे व्हा च्या घोषणा देण्यात आल्या. महाद्वार रोड परिसरातील मुख्य चौकात हे आंदोलन करण्यात आल्यामुळे काही वेळ वाहतुकीची कोंडी झाली. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ महिला आंदोलकाना ताब्यात घेतलं.
मुख्यमंत्र्यांनी वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी चंद्रपुरात आज भाजपने रास्ता रोको केला. चंद्रपुरात भाजप महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी चंद्रपूर-मूल महामार्गावर महाविदर्भ चौकात चक्का जाम करून आक्रोश व्यक्त केला. पूजा चव्हाण या मयत तरूणीला न्याय मिळावा यासाठी हे आंदोलन करण्यात आले. वनमंत्री राठोड यांच्या राजीनाम्याशिवाय या मृत्यू प्रकरणात निष्पक्ष चौकशी शक्य नसल्याचे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राठोड यांचा बचाव करत असल्याचा आरोप करत आधी राजीनामा द्या आणि मग चौकशी करण्याची जोरकस मागणी भाजप कडून रेटण्यात आली.
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांकडून काढून घ्यावा आणि हा तपास एखाद्या सक्षम आयपीएस अधिकाऱ्याला सोपवावा, अशी मागणी चित्रा वाघ यांनी राज्याच्या पोलीस महासचालकांकडे केली आहे. आमच्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे पुणे पोलिसांनी दिलेले नाहीत. सगळे पुरावे असतानाही पोलीस आणि सरकार कुणाचा वाट पाहते आहे, असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे.
काय आहे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण?
मूळची बीडमधल्या परळीची असलेल्या पूजा चव्हाण या 22 वर्षाच्या मुलीचा पुण्यातील राहत्या घरातून पडून 7 फेब्रुवारीला मृत्यू झाला. पूजाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय आहे. इंग्लिश स्पीकिंगच्या क्लाससाठी ती पुण्यात राहात होती. तिने इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केल्याचा संशय आहे. तिच्या आत्महत्येनंतर आत्महत्येशी विदर्भातील एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सुरु झाली होती. भाजपने तक्रार दाखल केली. शिवाय विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट पोलीस आयुक्तांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली. त्यातच पूजा चव्हाण आणि कथित मंत्र्यांच्या एक-दोन नव्हे तर तब्बल 12 ऑडिओ क्लिप समोर आल्या. त्यानंतर या ऑडिओ क्लिपमधील आवाज वनमंत्री संजय राठोड यांचाच असल्याचा दावा करत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राठोड यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.
Pooja Chavan Death Case | पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात पुणे लष्कर कोर्टात खटला दाखल