परभणी : राजकारणातील घराणेशाही बाबत नेहमी चर्चा होते.परंतु त्यात कुठलाही बदल अथवा वेगळा विचार आजही केला जात नाही.याला परभणी देखील अपवाद नाही. परभणी जिल्ह्यात बँकेची निवडणूक होते. मात्र ही निवडणूक घराणेशाहीच्या माध्यमातूनच होणार का? असा प्रश्न जिल्ह्यातील सर्वपक्षीय असंख्य कार्यकर्ते,पदाधिकारी यांना पडलाय त्याचे कारण ही तसेच आहे. बँकेच्या संचालक पदासाठी ज्यांनी अर्ज दाखल केले आहेत त्यात आजी माजी आमदारांची मुले, मुली एवढचं नाही तर इतर नातेवाईकांचाही समावेश आहे. महत्वाचे म्हणजे त्यांच्याकडे अगोदरच अनेक पदे आहेत.
राजकारणात असे म्हणतात ज्याच्या कडे जिल्हा बँकेच्या चाव्या त्याच्याकडेच ग्रामीण भागाची आर्थिक नाडी. या आर्थिक नाडी बरोबरच मोठं अर्थकारण इथं असल्याने प्रत्येक राजकारण्यांची जिल्हा बँक ताब्यात घेण्याची महत्वकांक्षा असते. मग कधी तडजोडी कधी थेट लढत तर कधी मिळून अशी ही बँकची निवडणूक लढवली जाते. परभणी आणि हिंगोली अशी दोन जिल्ह्यासाठी संयुक्त असलेल्या परभणी जिल्हा बँकेच्या 21 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे. 22 फेब्रुवारी पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती. ज्यात 21 जागांसाठी 154 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत. दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जाच्या नावाकडे नजर टाकली तर आजी माजी,आमदार त्यांचे चिरंजीव, स्नुषा,बहीण,आदी नातेवाईकांचाच भरणा आहे.
21 संचालक पदांसाठी 154 उमेदवारी अर्ज दाखल
21 संचालकांपैकी हे दोन आमदार बाबाजानी दुर्राणी, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर बिनविरोध झाले आहेत. यांच्या निवडीची केवळ औपचारिकता बाकी आहे.
नेते आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी दाखल केलेलं अर्ज
पाथरी विधानसभेचे आमदार सुरेश वरपुडकर त्यांचे चिरंजीव परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती समशेर सुरेश वरपुडकर व त्यांच्या पत्नी काँग्रेस नेत्या प्रेरणा समशेर वरपुडकर, माजी आमदार भाजप नेते रामप्रसाद बोर्डीकर यांच्या कन्या जिंतुरच्या भाजप आमदार मेघना साकोरे बोर्डीकर, भावना रामप्रसाद बोर्डीकर, काँग्रेस नेते माजी आमदार सुरेश देशमुख त्यांचे चिरंजीव सुशील सुरेश देशमुख, परभणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर, परभणी शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम , परभणी भाजप महानगराध्यक्ष आनंद भरोसे, राष्ट्रवादीचे वसमतचे आमदार चंद्रकांत उर्फ राजू नवघरे, हिंगोलीचे भाजप आमदार तान्हाजी सखाराम मुटकुळे, माजी खासदार शिवाजी माने , माजी आमदार रामराव वडकुते यांचे चिरंजीव शशिकांत रामराव वडकुते, हिंगोलीतील नेते साहेबराव पाटील गोरेगावकर, त्यांच्या स्नुषा रुपाली पाटील गोरेगावकर या परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील महत्वाच्या नेत्यांसह एकूण 154 जणांनी आपले अर्ज दाखल केलेले आहेत. यात 10 मार्च पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहेत. त्यामुळे यातील किती जण आपले उमेदवारी अर्ज मागे घेतात अथवा कायम ठेवतात हे पहावं लागणार आहे.
परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर आजपर्यंत माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर व विद्यमान आमदार सुरेश वरपुडकर या दोन नेत्यांच्याच ताब्यात राहिलेली आहे. 2015 साली झालेली निवडणुकीत हे दोन्ही नेते एकत्र आले होते. त्यांच्या पॅनल विरोधात माजी आमदार सुरेश देशमुख यांनी पॅनल उभा केला होता मात्र त्यांच्या पॅनलचा पराभव झाला होता व बोर्डीकर-वरपुडकर यांचा पॅनल विजयी झाला होता. त्यावेळी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकरांनी अध्यक्षपद आपल्याकडे ठेवत माजी आमदार कुंडलिक नागरे यांना अध्यक्षपदी तर उपाध्यक्ष पदी वरपुडकर गटाचे पंडित चोखट याना विराजमान केले होते. परंतु मार्च 2018 ला अध्यक्ष कुंडलिक नागरे यांचा मृत्यू झाल्याने पुन्हा अध्यक्षपदाची निवडणूक झाली ज्यात बोर्डीकर विरुद्ध वरपुडकर असा संघर्ष पुन्हा बघीतला मिळाला स्वतः सुरेश वरपुडकर यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यांचा अर्ज बाद झाल्याने त्यांनी अध्यक्षपदासाठी पंडित चोखट यांना उभे केलं. चोखट यांनी बोर्डीकर गटाचे विजय जामकर यांचा पराभव करून अध्यक्षपदी विराजमान झाले. आता पुन्हा एकदा याच दोन नेत्यांमध्ये या निवडणुकीत सत्तासंघर्ष रंगतोय ज्यातून आपापले नातेवाईक संचालक पदी निवडुन आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान राजकारणात एक पद असताना दुसरे पद आपल्या पक्षाच्या अथवा समर्थकासाठी सोडतो तो खरा नेता त्यालाच जननेता असे म्हणतात. मात्र अनेक पद घरात असताना पुन्हा नवीन पदासाठी आपल्याच कुटुंबातील सदस्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवून घराणेशाहीचे बळकटीकरण करणाऱ्या नेत्यांचा विचार त्यांच्या कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांनी करणे गरजेचे आहे.