नवी दिल्ली :  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता दिल्ली सरकारनं विद्यार्थ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतलाय. दिल्लीत तिसरी ते आठवीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या असून वर्कशीट आणि असाईनमेंटच्या आधारे विद्यार्थ्यांचं मूल्यांकन होणार आहे. अशा प्रकारचा निर्णय महाराष्ट्रातही घ्यावा अशी मागणी आता जोर धरायला लागली आहे.


दिल्लीचे शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांनी एका वृत्तवाहिनीसला दिलेल्य माहितीनुसार आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना डिटेन्शन पॉलिसीअंतर्गत पुढील वर्गात प्रमोट करण्यात येईल. परंतु विद्यार्थ्यांना सेमी ऑनलाईन क्लासेसमध्ये काय शिकवण्यात आले, हे देखील समजणे गरजेचे असून त्या आधारावर आम्हाला पुढील शैक्षणिक वर्षाची तयारी करता येईल. त्यामुळेच आम्ही या वर्षी आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचं वर्षभरात केलेल्या वर्कशीट आणि असाईनमेंटच्या आधारे मूल्यांकन होणार आहे.


राज्यात सातारा, लातूर, वाशिम अशा जिल्ह्यात विद्यार्थीच कोरोनाबाधित आढळल्यानं राज्यात आधीच चिंता वाढली आहे. पण राज्य सरकार मात्र अजूनही ऑफलाईन परीक्षा घेण्यावर ठाम दिसतंय. त्यामुळे दिल्लीप्रमाणे महाराष्ट्रातही निर्णय व्हावा अशी मागणी जोर धरायला लागली आहे.


काल (24 फेब्रुवारी) पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ पाहायला मिळाली. मागील 24 तासाच महाराष्ट्रात 8 हजार 807 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. सोबतच आज कोरोनामुळे 80 जणांचा मृत्यू झाला आहे. आज 2772 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. राज्यात एकूण 20 लाख 08 हजार 623 रुग्ण बरे घरी परतले आहेत. सध्या राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 59 हजार 358 आहे. तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 94.70 टक्के झालं आहे.


मुंबईत 119 दिवसांनंतर एक हजारांपेक्षा जास्त रुग्णांची नोंद
महाराष्ट्राची राजधानी मुंबईतही 119 दिवसांनंतर एक हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. मुंबईत आज 1 हजार 167 नवे कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. याशिवाय कोरोनामुळे मुंबईत आज चार जणांनी प्राण गमावले. मुंबईत काल म्हणजे 23 फेब्रुवारीला 643 नवे रुग्ण समोर आले होते. त्याआधी 22 फेब्रुवारीला 760, 21 फेब्रुवारीला 921 रुग्ण आणि 20 फेब्रुवारीला 897 नवे कोरोनाबाधित रुग्ण समोर आले होते.