यवतमाळ : राजकारण्यांनी साहित्य क्षेत्रात ढवळाढवळ करु नये, असा टोला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्य सरकारला दिला आहे. यवतमाळ येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या कार्यक्रमात गडकरी बोलत होते.
92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचे निमंत्रण ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना दिले होते. परंतु काही कारणास्तव सहगल यांना संमेलनाला येऊ नये, असे सांगण्यात आले. त्यामुळे देशभरातून राज्य सरकारवर टीका झाली. त्यामध्ये आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भर पडली आहे. साहित्य क्षेत्रात राजकारण्यांनी ढवळाढवळ करु नये, असा सल्ला देत गडकरींनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे.
गडकरी म्हणाले की, राजकारण्यांनी साहित्य, कला आणि इतर स्वायत्त संस्थांमध्ये हस्तक्षेप करु नये. परंतु त्यांच्यामध्ये आपसांत संबंध असायलाच हवा. लोकशाही आणि स्वातंत्र्याकरता त्याची आवश्यकता आहे. आणीबाणीच्या काळात पु. ल. देशपांडे आणि दुर्गा भागवत यांच्या सभांना नेत्यांपेक्षा मोठी गर्दी होत होती. लेखक मंडळींनी त्या काळात समाज प्रबोधन केले. त्यामुळे राजकारणी व साहित्यिकांमध्ये संबंध असणे गरजेचे आहे.
गडकरी म्हणाले की, आयोजकांनी वैशाली येडे ताईंना संमेलनाच्या उद्घाटनासाठी बोलावले, हे चांगलं केलं. त्यांनी पुस्तक लिहिले नसेल पण जीवन कसे जगायचे हे त्यानी दाखवून दिले आहे.
मराठी भाषेबाबत बोलताना गडकरी म्हणाले की, मराठी भाषेचे मोठेपण तुम्हाला त्या दिवसापर्यंत कळणार नाही, जोवर तुम्ही महाराष्ट्र सोडून बाहेर जात नाही. मराठी भाषा, मराठी साहित्य, मराठी नाटक किती श्रेष्ठ हे बाहेर गेल्यावरच कळेल.
छत्रपती शिवाजी महाराजांवरची पुस्तके वाचायची संधी मिळाली नसती तर ते कोण आहेत हे मला कळले नसते. मी त्यांच्या आदर्श घेऊन पुढे येऊ शकलो नसतो. त्यामुळे छत्रपती शिवरायांवरची पुस्तके सर्वांनी वाचायला हवीत.
राजकारण्यांनी साहित्य क्षेत्रात ढवळाढवळ करु नये, गडकरींचा सरकारला घरचा आहेर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Jan 2019 07:05 PM (IST)
राजकारण्यांनी साहित्य क्षेत्रात ढवळाढवळ करु नये, असा टोला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्य सरकारला दिला आहे. यवतमाळ येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या कार्यक्रमात गडकरी बोलत होते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -