रत्नागिरी : चिपळूणमध्ये वन विभागाने रक्तचंदनाचा मोठा साठा ताब्यात घेतला आहे. चिपळूणमध्ये टाकलेल्या धाडीत ताब्यात घेतलेल्या रक्तचंदनाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तब्बल 10 कोटी रुपये आहे.

तब्बल 600 नग रक्तचंदनाचे तीन ठिकाणाहून जप्त करण्यात आले. विशेष म्हणजे महाराष्ट्रातून विदेशात रक्तचंदनाची तस्करी  होत असल्याचं यातुन आता समोर येतं आहे. रक्तचंदनाच्या तस्करीसाठी आंतरराष्ट्रीय टोळीच सक्रीय आहे का, याचा शोध सध्या वन विभाग आणि चिपळूण पोलिसांनी सुरु केला आहे.



गेल्या तीन दिवसांपासून वन विभागाची झोप उडवली आहे ती म्हणजे चिपळूण येथे विविध ठिकाणी सापडणाऱ्या रक्तचंदनाने. चिपळूण येथे वन विभागाला रक्तचंदनाचा मोठा साठा गोवळकोट परिसरात असल्याची गुप्त माहिती मिळाली आणि वन विभागाच्या टीमने गोवळकोट येथील आफ्रिन पार्कच्या अल्‌-मदीना अपार्टमेंटमध्ये एका गाळ्यात धाड टाकून पहिल्याच दिवशी 92 नग चंदन जप्त केले. यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारावर त्याच परिसरात विविध ठिकाणी 500 नग रक्तचंदन जप्त करण्यात आता वन विभागाला यश आलं आहे.

याच रक्तचंदनाचा शोध घेत असताना वन विभागाला आणखी एका माहितीच्या आधारे गुहागर बायपास रोडवर दुसऱ्या दिवशी धाड टाकण्यात आली आणि तब्बल 102 नग रक्तचंदन जप्त करण्यात आलं होतं.

विशेष म्हणजे हे रक्तचंदन सोफ्यांच्या आतमध्ये पॅकिंग करून ठेवण्यात आलं होतं. एका शेडमध्ये सोफा तयार करण्याचे काम सुरु होते. तीन ठिकणी टाकलेल्या धाडीत वन विभागाला तब्बल 9 टनाचा माल जप्त केला गेला आणि याची किंमत भारतीय बाजारपेठेत दीड कोटी असली तरी आंतरराष्ट्रीय  तब्बल 10 कोटी रुपयांच्या घरात जात असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे.

गोवळकोट नजीकच्या एका शेडमध्ये फ्लाऊडपासून  सोफे तयार केले जायचे. याच सोफ्याच्या पोकळ भागात रक्तचंदनाचे ओंडके विशिष्ट पद्धतीने हुकद्वारे अडकवले जायचे आणि हा सोफासेट प्लास्टिकच्या गोणीमध्ये विशिष्ट पद्धतीने पॅक केलं जायचं.



कोकणात कुठेही रक्तचंदनाचं साधं झाड देखील बघायला मिळत नाही, तरी देखील एवढा मोठा रक्तचंदनाचा साठा आला कुठून, याचा शोध सध्या वन विभागाचं पथक घेतं आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर याच रक्तचंदनाची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या संपूर्ण साठ्यामागे आंतरराष्ट्रीय टोळी असण्याची शक्यता आहे.

दक्षिण भारतात खासकरून तामिळनाडू, कर्नाटक तसेच आंध्र प्रदेशच्या चित्तूर, कडप्पा, कुरनूल आणि नेल्लोर या चार जिल्ह्यांमध्ये रक्तचंदन अगदी मुबलक प्रमाणात आढळतं. त्यामुळे सोफ्यांचा वापर करुन हे रक्तचंदन महाराष्ट्रातून विदेशात तस्करीसाठी चिपळूणला आणला जात होता, असा अंदाज  वन विभागाला आहे.

जपान आणि चीन सारख्या देशांमध्ये रक्तचंदनाच्या औषधी गुणधर्मामुळे त्याला सर्वाधिक मागणी आहे. मागणी जास्त असल्यामुळे रक्तचंदनाची बेसुमार तोड दक्षीण भारतात झालेली पाहायला मिळते. रक्तचंदनाच्या तस्करीसाठी तामिळनाडू आणि आंध्रप्रदेश राज्याचं नावं आघाडीवर आहेत. महाराष्ट्रात देखील या अगोदर रक्तचंदनाचा साठा बेळगाव, कोल्हापूर, सातारा या ठिकाणाहून जप्त करण्यात आला होता. मात्र, त्यात आरोपी कोणीच सापडले नव्हते. चिपळुणातील या कारवाईमध्येही अद्याप एकाही व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलेले नाही. मात्र, दक्षिण भारतात सापडणारं रक्तचंदन चिपळूणला कसं आणि कोणी आणलं याचा शोध सध्या वनविभागामार्फत केला जातो आहे.

चिपळुणात उघड झालेल्या या रक्त चंदनाच्या रॅकेटमध्ये कोण कोण अडकले आहे, याचा शोध आता घेतला जातो आहे.