परभणी : जगाला प्रदक्षिणा घालण्यासाठी रवाना झालेला एक पत्रकार ऑस्ट्रेलियात अडकून पडला आहे. मात्र त्याचं स्वप्न साकार करण्यासाठी आई-बापानं एक धाडसी निर्णय घेतला आहे. आपल्या लेकरासाठी त्यांनी चक्क शेती विकण्याचा निर्णय घेतला.
एक तरुण... एक ध्येय... अनेक देश... शेकडो दिवस आणि हजारो किलोमीटरचा प्रवास... विष्णुदास चापके या तरुणानं जमीन आणि पाण्याच्या मार्गानं जगाला प्रदक्षिणा घालण्याचं ठरवत 9 महिन्यांपूर्वी कूच केली.
भारत, म्यानमार, थायलंड, लाओस, व्हिएतनाम आणि चीन असा प्रवास करुन त्याने ऑस्ट्रेलियात पाऊल ठेवलं आहे. पण आता पुढील प्रवासासाठी विष्णुदासकडे पुरेसा निधी नाही. त्यामुळेच परभणीतल्या कातणेश्वरमध्ये राहणाऱ्या कुटुंबियांनी मोठं पाऊल उचललं.
विष्णुदास यांच्या आई सुमन चापके लेकाचा अभिमान वाटत असल्याचं सांगतात, तर जमीन विकायला काढायची आहे, पण गिऱ्हाईक मिळत नाही अशी खंत विष्णुदास यांचे वडील शेषराव चापके यांनी बोलून दाखवली. ज्या मातीत शेषराव यांचं आयुष्य गेलं, त्याच मातीचा ते त्याग करणार आहेत, तेही फक्त मुलाच्या स्वप्नापोटी.
विष्णुदास मिळेल त्या गाडीने प्रवास करतो, आसरा मिळेल तिथे थांबतो, मिळेल ते खातो. आतापर्यंतचा पगार, पीएफ, हितचिंतक आणि मित्रांच्या आर्थिक मदतीनं त्यानं मोठा पल्ला गाठला, पण आता पैसेच नसल्यानं पुढचा प्रवास थांबला आहे.
दुष्काळी गाव, कोरडवाहू शेती, हालाखीची स्थिती अशी पार्श्वभूमी असतानाही विष्णुदासने मोठं स्वप्न पाहिलं. पण त्यापेक्षा मोठं मन दाखवलं ते त्याच्या कुटुंबियांनी. त्यामुळे विष्णूच्या मार्गातलं आर्थिक विघ्न लवकर दूर व्हावं आणि त्यानं इतिहास घडवावा, याच शुभेच्छा