सोलापुरात भाजप तालुकाध्यक्षाच्या हॉटेलवर छापा, 5 मुलींची सुटका
एबीपी माझा वेब टीम | 23 Jan 2017 08:34 AM (IST)
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथील सोलापूर-पुणे महामार्गावरील हॉटेल सुमितवर पोलिसांनी छापा टाकून 5 मुलींची सुटका केली आहे. याप्रकरणी हॉटेल मालक आणि भाजप तालुकाध्यक्ष संजय कोकाटे यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय कोकाटे यांच्या मालकीच्या सुमित हॉटेलमध्ये अवैध प्रकार होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. पोलिसांनी हॉटेलमध्ये बनावट ग्राहक पाठवून हॉटेलमधील अवैध व्यवसायाचा पर्दाफाश केला. दरम्यान आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावरच भाजप तालुकाध्यक्षाच्या हॉटेलमध्ये असा प्रकार समोर आल्याने भाजपसाठी ही अडचण ठरू शकते, असं बोललं जात आहे. त्यामुळे पक्षाकडूनही संजय कोकाटे यांच्यावर काही कारवाई केली जाते का, ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.