नागपूर : ऑनलाईन शॉपिंग करा, खरेदी केलेली वस्तू तुमच्या घरी सुरक्षित पोहोचवू, असा दावा अनेक कंपन्या करतात. मात्र, ह्याच ऑनलाईन कंपन्या वस्तूंच्या डिलिव्हरीमध्ये किती काळजी घेतात याचा धक्कादायक प्रत्यय आणणारी घटना नागपुरात घडली आहे.


अमेझॉन या नामांकित ऑनलाईन शॉपिंग कंपनीच्या गोदामातून 60 लाखांच्या वस्तू घेऊन निघालेला ट्रक चोरट्यांनी पळवला. शर्थीचे प्रयत्न करुन पोलिसांनी भंडारा जिल्ह्यातून ट्रकसह किंमती वस्तू जप्त केल्या. मात्र, तोपर्यंत चोरटयांनी एकेक वस्तू काढून विकायला सुरु केलं होतं.

नागपूरसह विदर्भासाठी अमेझॉन कंपनीतून येणाऱ्या वस्तू नागपूर विमानतळावर उतरवल्या जातात. इथून सगळ्या वस्तू वेगवेगळ्या ठिकाणी पाठवण्यासाठी कंपनीने टीसीआय कंपनीसोबत करार केला आहे.

कशी झाली ट्रकची चोरी?



7 ऑक्टोबर रोजी मिहानमध्ये असलेल्या टीसीआयच्या गोदामातून mh 40 n 7533 या क्रमांकाचा ट्रक निघाला. मात्र, ट्रकवर जीपीएस यंत्रणा किंवा कोणतंही सर्व्हिलिएंस नाही हे वाहन चालक सुदर्शन मेश्रामने हेरले. ट्रक नियोजित दिशेत न नेता भंडारा जिल्ह्यातील पवनीकडे अज्ञात ठिकाणी नेला. परंतु अमेझॉनचा ट्रक निश्चित ठिकाणी न पोहोचल्यामुळे कंपनीत खळबळ उडाली. ट्रकमध्ये महागडे मोबाइल, टीव्ही, घड्याळ, पेन ड्राईव्ह, ज्वेलरी अशा एकूण 58 लाख 90 हजारांच्या वस्तू होत्या.

खबरीमार्फत ट्रकचा शोध

एवढी मोठी चोरी झाल्याची तक्रार आल्यामुळे नागपूर पोलिसांची पथकं कामाला लागली. खबरीमार्फत एक मोठा कंटेनर ट्रक भंडारा जिल्ह्यातील पवनी भागात निर्जन ठिकाणी 2 दिवसांपासून उभा असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तिथे धाड टाकून ट्रक चालक सुदर्शन मेश्राम आणि संतोष शेंद्रे या दोघांना अटक केली. दोन दिवसांपासून सुदर्शनने संतोषच्या मदतीने परिसरातील लोकांना स्वस्तात मोबाईल आणि इतर वस्तू विकल्या होत्या.

पोलिसांच्या प्रयत्नामुळे लाखोंच्या चोरीच्या या प्रकरणात बहुतांशी वस्तू जप्त झाल्या आहेत. त्यामुळे अमेझॉन कंपनीचा जीव भांडयात पडला आहे. मात्र, 60 लाखांचा माल कोणत्याही सुरक्षेशिवाय रस्त्यावर पाठवणाऱ्या या नामांकित कंपनीचं पीतळ उघडं पडलं आहे.