नागपूर : नागपुरात एका दाम्पत्याने फुटाळा तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याचं वृत्त आहे. आर्थिक विवंचनेतून कु्र्यवंशी दाम्पत्याने आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे. दिनेश आणि योगिता कुर्यवंशी यांनी हे टोकाचं पाऊल उचललं.


दिनेश यांचे सुरेन्द्रगड परिसरात चहा आणि नाश्त्याचे व्यवसाय होते. दोघेही परिसरात बचत योजनाही चालवायचे. लोकांकडून पाचशे, हजार रुपये रक्कम दर महिन्याला गोळा करुन ठराविक दिवसांनी त्यांना व्याज देणे अशी ही योजना होती.

गोळा केलेली रक्कम कुर्यवंशी दाम्पत्य एका व्यक्तीकडे गुंतवत होते. मात्र त्या व्यक्तीने पैसे परत न केल्यामुळे त्यांची बचत योजना डबघाईस आली होती. इतरांचे पैसे परत करण्यात अपयशी ठरल्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती आहे.

मंगळवारी रात्री दोघेही नेहमीपेक्षा लवकर झोपले होते. पहाटे मुलांना आणि इतर कुटुंबीयांना काहीच न सांगता दोघे घराबाहेर पडले आणि फुटाळा तलावात येऊन उडी मारली. दिनेश कुर्यवंशी यांची दुचाकी आणि दोघांच्या चपला तलावाच्या शेजारी सापडल्यामुळे दोघांनी आत्महत्या केल्याचा संशय बळावला होता. सकाळी पोलिसांनी शोध मोहीम राबवली तेव्हा दोघांचे मृतदेह फुटाळा तलावात आढळले.