जालना : लेडी सिंघम म्हणून परिचित असलेल्या जालन्याच्या पोलीस अधिक्षक ज्योतीप्रिया सिंह यांना काल निरोप देण्यात आला. तीन वर्षांपासून जालन्यात पोलीस अधिक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या ज्योतिप्रिया सिंह यांची पुण्यात पोलिस उपायुक्तपदी बदली झाली आहे.
ज्योतीप्रिया सिंह यांच्या जागी जालन्यात रामनाथ पोकळे यांची पोलीस अधिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. मावळत्या पोलीस अधिक्षक ज्योतिप्रिया सिंह यांना निरोप देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लेडी सिंघम म्हणून परिचित असलेल्या पोलिस अधिक्षकांना निरोप देण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ज्योतीप्रिया सिंह यांच्या गाडीला खास विविध प्रकारच्या फुलांनी सजवलं होतं.
ज्योतीप्रिया सिंह यांना या खास सजवलेल्या गाडीत बसवून निरोप देण्यात आला. अप्पर पोलिस अधिक्षक राहुल माकनिकर यांना देखिल अधिकाऱ्यांनी अशाच प्रकारे निरोप दिली.
दरम्यान आपल्या तीन वर्षांच्या कारकिर्दीत ज्योतीप्रिया सिंह यांनी जालना शहरासह जिल्ह्यातील अनेक अवैध धंद्याना चाप लावला. त्यामुळे त्यांची जालन्यातील तीन वर्षांची कारकीर्द चांगलीच गाजली.