सोनिया गांधींचा निरोप घेऊन मनिष तिवारी राणेंच्या भेटीला
एबीपी माझा वेब टीम | 01 May 2017 06:30 PM (IST)
मुंबई : काँग्रेस नेते नारायण राणे भाजपच्या गोटात जाणार असल्याची जोरदार चर्चा असतानाच त्यांच्या मनधरणीसाठी काँग्रेस नेत्यांनी हालचाली सुरू केल्याची माहिती आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनिष तिवारींनी काल उशिरा रात्री नारायण राणेंची भेट घेतल्याची माहिती आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा निरोप पोहोचवण्यासाठी मनिष तिवारी नारायण राणेंना भेटल्याची माहिती एबीपी माझाच्या सुत्रांनी दिली आहे. दरम्यान याआधी राहुल गांधींचा निरोप घेऊन मिलिंद देवरांनी देखील नारायण राणेंशी चर्चा केल्याचं बोललं जात होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा मनिष तिवारींनी राणेंची भेट घेतली आहे. मिलिंद देवरांची भेट निष्फळ? काँग्रेसचे दिग्गज नेते मिलिंद देवरा आणि नसीम खान यांनी राणेंची भेट घेतली होती. दिल्लीतील काँग्रेस हायकमांडच्या सूचनेनुसारच ही भेट झाल्याचं वृत्त आहे. भेटीत दोघांनी राणेंची मनधरणी केली. मात्र त्यात राणेंनी फारशी दाद दिली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. नारायण राणे आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांची अहमदाबादेतील भेट गुप्त होती. पण ती उघड झाल्याने भाजपमध्ये गोंधळ उडाल्याचं म्हटलं जातं. भाजपमध्ये एक मोठा दबावगट राणेंविरुद्ध तयार झाला आहे. त्यामुळे राणेंचा पक्षप्रवेश आता काही दिवस तरी होल्डवर ठेवण्यात आला आहे. सुरुवातीला नारायण राणेंचा भाजप प्रवेश सुकर मानला जात होता. पण गुप्त भेटीची बातमी फुटल्याने त्यांच्या पक्षप्रवेशात अडचणी निर्माण झाल्या. काँग्रेसमध्ये त्यांच्याविरोधात अविश्वासाचं वातावरण निर्माण झालं आहे. जर ही भेट गुप्त राहिली असती तर नारायण राणे स्वत:च्या अटींवर भाजपमध्ये प्रवेश करु शकले असते. पण भेटीची बातमी जगजाहीर झाल्यानं त्यांना भाजपच्या अटींवर प्रवेश करावा लागण्याची शक्यता आहे. संबंधित बातम्या :