औरंगाबाद : मुस्लीम बांधवांच्या इस्तिमा म्हणजेच मुस्लीम अधिवेशनाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. औरंगाबादजवळील लिंबे जळगाव या ठिकाणी होणाऱ्या या इस्तिम्याला पोलिसांनी वाहतूक आणि इतर व्यवस्था होत नसल्याच्या कारणावरुन परवानगी नाकारली.
24, 25 आणि 26 फेब्रुवारीला होणाऱ्या या कार्यक्रमासाठी 25 जिल्ह्यातून अंदाजे 25 लाख मुस्लीम बांधव येतील, असा दावा आयोजकांकडून करण्यात आला आहे.
या जमावाचं व्यवस्थापन आणि वाहतूक नियोजन करण्यासाठी किमान तीन महिने अगोदर परवानगी मागणं गरजेचं आहे. मात्र अशी कोणतीही पूर्व कल्पना देण्यात आलेली नाही, असं म्हणत पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.
''एवढ्या मोठ्या कार्यक्रमासाठी निधी कुठून आला?''
तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमासाठी आतापर्यंत 11 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. त्यामुळे याबाबतची रितसर माहिती शासनाच्या संबंधित विभागाला दिली आहे का, अशी विचारणाही पोलिसांनी केली आहे. त्यामुळे एवढा मोठा निधी कसा जमवला, त्याचा स्रोत काय होता, याबद्दल माहिती आता आयोजकांना द्यावी लागणार आहे.