Maratha Reservation: मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार आहेत. यासाठी मागील पाच दिवसांपासून जरांगे आंतरवाली ते मुंबई असा पायी प्रवास करत आहेत. दरम्यान, उद्या रात्री मनोज जरांगे मुंबईच्या आझाद मैदानावर दाखल होणार असून, त्यासाठी मुंबईतील मराठा आंदोलक कामाला लागले आहेत. तर, जरांगे मुंबईत दाखल होण्यापूर्वीच आझाद मैदानात मराठा मोर्चाचा एल्गार सुरू झाला आहे. त्यामुळे नारळ फोडून उद्यापासून सुरू होणाऱ्या आंदोलनाच्या तयारीची सुरूवात करण्यात आली आहे. मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलक वीरेंद्र पवार यांच्या उपस्थितीत ही तयारी करण्यात येत आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली. विशेष म्हणजे पोलिसांनी जरांगे यांना नोटीस पाठवून आंदोलनाची परवानगी नाकारली आहे.
दरम्यान याबाबत बोलतांना मनोज जरांगे म्हणाले की, मराठा आरक्षणावर आम्हाला तोडगा काढायचा असून, यासाठी लोणावळा येथे थांबलो. आम्ही आंदोलन करत असलो तरीही आम्हाला तोडगा देखील काढायचा आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी स्वतः येऊन यावर शेवटचा तोडगा काढून आरक्षण दिले पाहिजे असे मनोज जरांगे म्हणाले आहेत.
कारवाईला देखील घाबरत नाही...
दरम्यान पोलिसांनी पाठवलेल्या नोटीसवर बोलतांना मुंबईतील मराठा क्रांती मोर्च्याच्या पदाधिकारी यांनी म्हटले आहे की,'पोलिसांनी परवानगी नाकारली असल्याचे नोटीसमध्ये सांगण्यात आले आहेत. मात्र, मनोज जरांगे हे अशा कोणत्याही नोटीसला घाबरत नाही. तसेच कारवाईला देखील घाबरत नाही. ते मुंबईकडे निघणार आहे. 26 जानेवारीच्या निमित्ताने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न मुंबईत निर्माण होण्याची शक्यता असल्याचे देखील पत्रात म्हटले आहेत. तसेच याबाबत मनोज जरांगे हे आपला निर्णय जाहीर करतील असेही मुंबईतील मराठा क्रांती मोर्च्याच्या पदाधिकारी यांनी म्हटले आहेत.
मुंबईत तगडा बंदोबस्त...
मनोज जरांगे हे मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषण करणाऱ्यावर ठाम आहेत. तसेच,आपण कायदेशीर मार्गाने आंदोलन करत असल्याचे जरांगे म्हणाले आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून आंदोलनाच्या मार्गावर तगडा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. सोबतच, मनोज जरांगे मुबईत आल्यावर कोणत्याही प्रकारे वाहतूक कोंडी होऊ नयेत यासाठी पोलिसांकडून नियोजन करण्यात येत आहे. विशेष म्हणजे जरांगे यांच्या आझाद मैदानावरील आंदोलनाची परवानगी पोलिसांनी नाकारली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: