मुंबई : एसटी महामंडळाच्या (Maharashtra State Road Transport Corporation) शहरातील मध्यवस्तीत असलेल्या जागांवर पोलिस वसाहती (Police colonies) बांधण्यात येणार आहेत. एसटी महामंडळाने याबाबत राष्ट्रीय परिवहन मंडळाच्या सर्व जिल्ह्यांच्या विभाग नियंत्रकांना सूचना दिल्या आहेत. त्यासाठी महामंडळाकडून राज्यातील सर्व विभाग नियंत्रकांना पत्र लिहण्यात आले आहे. "महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे जिल्हा मुख्यालय तसेच शहराच्या ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या जागेमध्ये पोलिस वसाहती बांधण्यासाठी जागेची यादी तयार करण्याबाबत सुचित करण्यात आले आहे, असे महामंडळाच्या पत्रात म्हटले आहे.
13 सप्टेंबर रोजी एसटी महामंडळ आणि राज्याचे मुख्य सचिव यांची याबाबत बैठक झाली होती. या बैठकीत एसटी महामंडळाच्या रिक्त जागेत पोलिस वसाहती बांधण्याबाबत विचार झाला होता. मुख्य सचिवांनी त्यावेळी याबाबतचा आढावा घेतला होता. त्यानुसार आता एसटी महामंडळाच्या जागेत पोलिस वसाहती बांधण्यात येणार आहेत.
काय म्हटले आहे महामंडळाच्या पत्रात?
"कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन यांनी कळविल्यानुसार 13 सप्टेंबर 2022 रोजी राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे जिल्हा मुख्यालय तसेच शहराच्या ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या जागेमध्ये पोलिस वसाहती बांधण्यासाठी जागेची यादी तयार करण्याबाबत सुचित करण्यात आले आहे. आपल्या विभागाच्या रिक्त जागेचा एस. टी. महामंडळाच्या प्रयोजनार्थ आणि भविष्यातील वाहतुकीची निकड लक्षात घेऊन राखीव ठेवण्यात याव्यात, तसेच उर्वरित रिक्त जागा पोलिस वसाहती बांधण्यासाठी उपलब्ध करून देता येईल किंवा कसे याबाबत माहिती देण्यात यावी." असे राज्य परिवहन महामंडळाच्या पत्रात म्हटले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून पोलिस वसाहतींचा प्रश्न ऐरणीवर आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या जागेत जर पोलिस वसाहती उभारण्यात आल्या तर हा प्रश्न मार्गी लागणार आहे. शिवाय सतत तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाला देखील त्याचा फायदा होणार आहे. पोलिस वसाहती या शहाराच्या मध्यभागी असल्यास पोलिसांना त्याचा फायदा होणार आहे. महामंडळाने त्यांच्या मध्यवर्ती भागातील जागांची माहिती घेण्याच्या सूचना सर्व जिल्ह्यांच्या विभाग नियंत्रकांना दिल्या आहेत. त्यामुळे जर महामंडळाच्या अशा मध्यवर्ती भागात पोलिसांना राहण्यासाठी वसाहती उपलब्ध झाल्या तर त्याचा पोलिसांना देखील चांगला फायदा होणार आहे.
महत्वाच्या बातम्या