मालवण : ओखी चक्रीवादळाचा परिणाम कोकण आणि महाराष्ट्राच्या किनारपट्ट्यांवर मोठ्या प्रमाणात आता जाणवू लागला आहे. यामुळे कोकणातल्या समुद्रांनी रात्री रौद्ररुप धारण केलं आहे. यामुळे काल (रविवार) रात्री समुद्राला आलेल्या उधाणात मालवण बंदरात उभी असलेली पोलिसांची ‘सिंधू ५’ ही गस्तीनौका बुडाल्याची माहिती मिळते आहे.


लाटांच्या तडाख्याने बोटीत पाणी शिरल्याने ही बोट बुडाल्याची प्राथमिक माहिती समजते आहे. दरम्यान याच वेळी ‘सिंधू २’ या गस्तीनौकेतही पाणी शिरले होते. पण वेळीच पाणी उपसा केल्यानं सिंधू २ बोटीला वाचवण्यात यश आलं.

सध्या बुडालेल्या सिंधू ५ नौकेला पाण्याबाहेर काढण्याचे प्रयत्न अजूनही सुरु आहेत. या घटनेची माहिती मिळताच मालवण पोलीस बंदर जेटीवर दाखल झाले आहेत.



सिंधुदुर्ग जिल्ह्यात समुद्राला उधाण

सिंधुदुर्ग जिल्ह्यातही ओखी वादळाचा परिणाम पाहायला मिळत आहे. मालवण, वेंगुर्ले, देवगड समुद्र किनाऱ्यावर तडाखा बसला आहे. कोचरा-देवबागला समुद्राचं पाणी वस्तीत घुसलं. किनाऱ्यावरील मच्छीमार बांधव आणि स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. तर मालवण तालुक्यातील आचरा, मेढा, दांडी, किनारपट्टीलाही समुद्राच्या उधाणाचा तडाखा बसला आहे. पिरावाडी गावाशी संपर्क तुटला आहे तर देवबागमध्ये कुर्लेवाडीत पाणी घुसलं आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात अनेक भागात समुद्राचं पाणी

रत्नागिरीतही अनेक किनारपट्टीच्या भागात समुद्राचं पाणी किनाऱ्याच्या भागात घुसलं आहे. पावसाळ्यात जितकं पाणी चढतं तेवढं पाणी किनाऱ्याच्या भागात चढलं आहे. त्याचबरोबर लाटांचं प्रमाणही वाढलं आहे. त्यामुळे किनारपट्टीवरच्या भागातील गावांना अतिसतर्कतेचा इशारा दिला आहे. तर काही ठिकाणी स्थानिकांनी रस्त्यांवर गर्दीही केल्याचं पाहायला मिळतं आहे.

संबंधित बातम्या :

कोकण किनारपट्टीला ओखी वादळाचा फटका, समुद्राला उधाण