मुंबई : केरळ आणि तामिळनाडूच्या किनारपट्टीवर धुमाकूळ घालणारं ओखी चक्रीवादळ पुढच्या काही तासात कोकण किनारपट्टीवर येऊन धडकणार आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीतल्या सर्व जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

तामिळनाडू, केरळ आणि लक्षद्वीपमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर हे वादळ आता थेट मुंबई आणि कोकणाच्या दिशेने सरकत आहे. भारतीय हवामान खात्याकडून मिळालेल्या सूचनेनुसार 6 तारखेपर्यंत सावधानता बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, ठाणे, मुंबई किनारपट्टीतही सतर्क राहण्यास सांगण्यात आलं आहे.

पुढच्या 48 तासात ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषतः 4 आणि 5 डिसेंबरला मुंबई लगतच्या अरबी समुद्राला ओखी वादळाचा तडाखा बसण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई, कोकणात मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

या ओखी वादळाच्या वाऱ्यांमुळे मुंबईच्या किनाऱ्यावर मोठ्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. ऐन थंडीमध्ये मुंबईकरांना पावसाळा अनुभवायलाही मिळण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे मुंबईकरांनी पुढचे काही दिवस समुद्रकिनारी सतर्कता बाळगायला हवी.

ओखी वादळाचा फटका गोव्यामध्ये बसू लागला आहे. खवळलेल्या समुद्रात बुडताना दोन परदेशी महिला पर्यटकांना वाचवण्यात आलं आहे. ओखी वादळामुळे स्विमथॉन स्पर्धाही रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे या स्पर्धेसाठी आलेल्या 700 स्पर्धकांची निराशा झाली आहे.