सांगली : सांगलीतल्या कुपवाड येथे झालेल्या राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याच्या खुनाचा छडा सांगली पोलिसांनी अवघ्या 24 तासात लावला आहे. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. भांडणाचा राग मनात धरून ही हत्या करण्यात आल्याची कबुली संशयित आरोपींनी दिल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून देण्यात आली आहे.


सांगलीच्या कुपवाड एमआयडीसी या ठिकाणी शुक्रवारी सांगली महापालिका क्षेत्र राष्ट्रवादी काँग्रेस युवक जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय पाटोळे यांची हत्या करण्यात आली होती. थरारक पाठलाग करत सिनेस्टाईलने हल्लेखोरांनी पाटोळे यांचा धारदार शस्त्रांनी वार करत खून केला होता. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाणेमध्ये गुन्हा दाखल झाला होता. अज्ञात हल्लेखोरांचे सीसीटीव्ही फुटेज घटनास्थळावरून पोलिसांना मिळाले होते. त्यावरून सांगली पोलिसांनी तपास सुरू केला होता.

सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षचा दिवसाढवळ्या भोसकून खून


त्यांनंतर अवघ्या 24 तासात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पाटोळे खून प्रकरणातील पाच संशयितांना बेडया ठोकल्या आहेत. निलेश गडदे, सचिन चव्हाण, वैभव शेजाळ, मृत्युंजय पाटोळे आणि किरण लोखंडे अशी अटक केलेल्या पाच आरोपींची नावं आहेत. यापैकी एक संशयित आरोपी मृत पाटोळे यांचा नातेवाईक असल्याचे समोर आलं आहे.


मृत पाटोळे यांच्या घराजवळ राहणाऱ्या संशयित आरोपी निलेश गडदे याच्याशी काही महिन्यांपूर्वी भांडण झालं होतं. आणि या भांडणाचा राग मनात धरून शुक्रवारी संशयित आरोपी निलेश गडदे याने आपल्या साथीदारांसह कुपवाड एमआयडीसीच्या रोहिणी अॅग्रोटेक कोल्डस्टोरेज याठिकाणी सिनेस्टाईलने थरारक पाठलाग करत दत्तात्रय पोटोळे यांचा खून केला होता. यावेळी एक कामगार सुद्धा या हल्लेखोरांच्या हल्ल्यात जखमी झाला होता. कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये या खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून या प्रकरणाचा तपास सुरू होता आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने वेगाने तपास करत पाटोळे यांच्या हत्येचा अवघ्या 24 तासांत छडा लावत आरोपींना केली आहे.





NCP Leader Dattatray Patole Murder | सांगलीत कुपवाडमध्ये राष्ट्रवादी शहर उपाध्यक्षाची हत्या