PM Narendra Modi Wishes Maharashtra Din : मराठी माणसासाठी महाराष्ट्र दिनाचा (Maharashtra Divas) उत्साह खूप मोठा असतो.  गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्र दिनाचा उत्साह कोरोनामुळं अनुभवता आला नव्हता. यंदा मात्र कोरोनाचे निर्बंध नसल्यानं महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा होत आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीमध्ये ट्वीट करत खास शुभेच्छा दिल्या आहेत. 


पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की,  महाराष्ट्रातील सर्व जनतेला महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. देशाच्या प्रगतीत या राज्याने अभूतपूर्व योगदान दिले आहे. इथल्या लोकांनी विविध क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या समृद्धीसाठी मी प्रार्थना करतो, असं त्यांनी म्हटलं आहे. 






देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी म्हटलं आहे की, राज्य स्थापना दिनानिमित्त महाराष्ट्रातील सर्व जनतेला शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महान महापुरुषांनी  महाराष्ट्र आणि भारतासाठी आपलं योगदान देत समृद्ध केलं आहे. राष्ट्राच्या आर्थिक विकासात महाराष्ट्राचं योगदान महत्वाचं आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.  






 वैभवशाली सांस्कृतिक परंपरेने समृद्ध वीरभूमी महाराष्ट्र- केंद्रीय मंत्री अमित शाह

 केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी देखील मराठीमध्ये ट्वीट करत महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी म्हटलं आहे की, देशाला स्वराज्य, सुशासन, सामाजिक न्याय आणि लोकशाहीचा संदेश देणाऱ्या वैभवशाली सांस्कृतिक परंपरेने समृद्ध असलेल्या वीरभूमी महाराष्ट्राच्या सर्व नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.मी महाराष्ट्राच्या निरंतर प्रगती आणि समृद्धीसाठी प्रार्थना करतो.






महाराष्ट्राचा धार्मिक, सामाजिक सुधारणांचा इतिहासही प्रेरणादायी -केंद्रीय मंत्री नितीन गडकरी 

सामाजिक, वैचारिक, राजकीय, ऐतिहासिक, सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रांचा भक्कम वारसा लाभलेल्या महाराष्ट्र राज्याने हा अमूल्य वारसा सांभाळतानाच देशाच्या विकासातही महत्त्वाचे योगदान दिले आहे. महाराष्ट्राचा धार्मिक, सामाजिक सुधारणांचा इतिहासही प्रेरणादायी आहे, संत-महंत, ऋषी-मुनी आणि शूरवीरांची भूमी असलेल्या अशा या महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.






महाराष्ट्राची भारताच्या आर्थिक प्रगतीत नेहमीच अग्रणी भूमिका - ओम बिर्ला

ऐतिहासिक दृष्ट्या महाराष्ट्राने देशाप्रती सर्वोच्च योगदान दिले आहे.महाराष्ट्रात अशा थोर विभूतिंचा जन्म झाला ज्यांनी या राष्ट्राला दिशा दिली.प्राकृतिक सौंदर्याने नटलेल्या महाराष्ट्राची भारताच्या आर्थिक प्रगतीत नेहमीच अग्रणी भूमिका राहिली. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, असं लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी म्हटलं आहे.