Devendra Fadnavis : मशिदीवरील भोंग्यांना विरोध आणि हनुमान चालिसाचा मुद्दा उपस्थित करून आक्रमक हिंदुत्वाची भूमिका घेणाऱ्या राज ठाकरेंनी राज्यातलं राजकीय वातावरण ढवळून काढलं आहे. त्यातच राज ठाकरेंच्या आज औरंगाबाद मध्ये होणाऱ्या बहुचर्चित सभेकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.. महाराष्ट्र दिनी होणाऱ्या या सभेचं काऊंटडाऊन सुरु झालंय. अशातच आता भारतीय जनता पार्टीकडून देखील देवेंद्र फडणवीसांच्या बुस्टर डोस सभेचं आयोजन करण्यात आले आहे. ही सभा मुंबईच्या सोमय्या मैदानावर होणार आहे. मेट्रो कारशेड प्रकल्पापासून ते राज्यातील विविध घोटाळ्यांबाबत देवेंद्र फडणवीस बोलणार असल्याचे भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी म्हटले आहे. त्यामुळे फडणवीसांच्या भाषणाची सर्वांनाच उत्सुकता आहे.


राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा 
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. औरंगाबादमध्ये होणाऱ्या या सभेत राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर आणखी एक टीझर मनसेनं प्रसिद्ध केलाय. या सभेसाठी राज ठाकरे आज औरंगाबादमध्ये पोहोचले असून मनसैनिकांनी त्यांचे जंगी स्वागत केले आहे. ढोल आणि ताशाच्या गजरात राज ठाकरे यांचे स्वागत करण्यात आले. राज्यातील सध्याच्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंची औरंगाबाद येथील सभा चर्चेत आहे. राज ठाकरे यांच्या या सभेआधी वातावरण तयार करण्याचा प्रयत्न मनसेनं काल केला. औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर्स लावण्यात आले आहेत. याबरोबरच राज ठाकरे यांच्या सभेची जोरदार तयारी सुरू असून सभेच्या प्रचारासाठी भोंगे लावलेल्या रिक्षांमार्फत शहरात या सभेचा प्रचार करण्यात येत आहे. याच प्रचार रिक्षांचा काल मनसे नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला आहे.   


 




 


राज्यात महासभांचा धडाका


मनसे (MNS), शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादीपाठोपाठ (NCP) आता भाजपनेही (BJP) सभेचे आयोजन केले आहे. 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुंबईतील सोमय्या मैदानावर सभा घेणार आहेत. भाजप कार्यकर्त्यांना बुस्टर डोस देण्यासाठी आणि ठाकरे सरकारला (Thackeray Government) डोस देण्यासाठी 'बुस्टरडोस' सभा घेण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी दिली आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त सन्मान सोहळाही आयोजित करण्यात आला आहे.  सोहळ्यासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मंगलप्रभात लोढा, आमदार आशिष शेलार,  भाजपा मुंबई प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांची प्रमुख उपस्थिती असणार  आहे. राज्यात तसेच देशात गाजत असलेल्या महत्वाच्या राजकीय विषयांवर भाजपची भूमिका काय असेल? यासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. 1 मे रोजी संपूर्ण महाराष्ट्र फडणवीसांच्या भाषणाचा अनुभव घेईल.