PM Narendra Modi Visit Yavatmal : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज (28 फेब्रुवारी) रोजी यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यवतमाळमधील भारी गावाजवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. तब्बल 45 एकरवर उभारण्यात आलेल्या कार्यक्रमस्थळी पंतप्रधान मोदी (PM Modi) हे दीड लाखांहून अधिक बचत गटांच्या महिलांना संबोधीत करणार आहे. गेल्या आठवड्याभरापासून या सभेची जोरदार तयारी केली जात आहे. मात्र, या सभास्थळी लावण्यात आलेल्या असंख्य खुर्च्यांवर राहुल गांधी(Rahul Gandhi) यांचे स्टिकर लावण्यात आले असून यात काँग्रेसला देणगीचे आवाहन करणारी जाहिरात करण्यात आली आहे. त्यामुळे मोदींच्या सभेत राहुल गांधीच्या (Rahul Gandhi) स्टिकर लावलेल्या खुर्च्या का? असा प्रश्न या निमित्याने उपस्थित झाला असून या खुर्च्याची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.  


खुर्च्यावर काँग्रेसला देणगीचे आवाहन करणारी जाहिरात?


पंतप्रधान नरेंद्र मोदी यवतमाळ जिल्ह्यातील भारी शिवार येथे येणार असल्याने मागील अनेक दिवसांपासून पंतप्रधानांच्या सभेसाठी जय्यत तयारी केली जात होती. या मेळाव्याला महिला मोठ्या प्रमाणात येत असल्याने पोलिसांचा मोठ्या प्रमाणात कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. महिला बचत गटांचा महामेळावा, असं या सभेचा स्वरूप असून या सभेमध्ये एक लाख पेक्षा जास्त महिला उपस्थित राहतील, असा आयोजकांचा दावा आहे. सभास्थानी मोठ्या संख्येने खुर्च्या लावण्यात आल्या असून काही खुर्च्या अशाही आहेत ज्यांच्या पाठीमागे राहुल गांधी यांचे स्टिकर लावण्यात आलेले आहे. त्यामुळे मोदींच्या सभेत राहुल गांधीच्या स्टिकर लावलेल्या खुर्च्या का?? असा प्रश्न सर्वांना उपस्थित होत आहे. मात्र, मुळात ही चूक खुर्च्या पुरवणाऱ्या कंत्राटदाराची असून याच खुर्च्या काही दिवसांपूर्वी नागपुरात काँग्रेसच्या मेळाव्यात वापरण्यात आल्या होत्या. तेव्हा प्रत्येक खुर्चीच्या मागे काँग्रेसला देणगी देण्यासंदर्भात माहिती देणारे  स्टिकर लावण्यात आले होते. त्यावर राहुल गांधी यांचा फोटो आणि काँग्रेस पक्षाला देणगी देण्यासंदर्भात आवश्यक तपशीलासह क्यूआर कोड छापण्यात आलेला होता. आज मोदीच्या सभेसाठी आणलेल्या खुर्च्यामध्ये काही खुर्च्या काँग्रेसच्या मेळाव्यात वापरण्यात आलेल्या असाव्यात आणि त्यामुळेच त्यांच्यावर हे स्टिकर दिसून येत आहेत.


पंतप्रधान चौथ्यांदा यवतमाळ दौऱ्यावर


पंतप्रधान मोदी हे चौथ्यांदा यवतमाळ जिल्हाच्या दौऱ्यावर येत आहेत. 2004  मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री असताना ते यवतमाळला आले होते. त्यांची जाहीर सभा पोस्टल ग्राउंडवर झाली होती. यानंतर 20 मार्च 2014 ला लोकसभा निवडणुकीपूर्वी आर्णीजवळ असलेल्या दाभडी येथे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून आले होते. त्यावेळी त्यांनी ‘चाय पे चर्चा’तून देशभरातील शेतकऱ्यांशी संवाद साधला होता. यानंतर लोकसभा निवडणुकीपूर्वी 16 फेब्रुवारी 2019  रोजी यवतमाळच्या पांढरकवडा येथे महिला बचत गटाच्या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी देखील ते आले होते. आता पुन्हा पंतप्रधान मोदी हे यवतमाळ येथे येत असल्याने महाराष्ट्र आणि यवतमाळ येथे येण्याची ही पंतप्रधानांची चौथी वेळ आहे. आजच्या कार्यक्रमात राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राज्यमार्ग मंत्री नितीन गडकरी, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गिरीश महाजन, यवतमाळ-वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड, कृषी मंत्री धनंजय मुंडे, गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, केंद्रीय मागासवर्ग आयोग अध्यक्ष हंसराज अहिर आदी उपस्थित राहणार आहेत.


महत्वाच्या इतर बातम्या :


दिलेल्या आश्वासनांचं काय झालं?, यवतमाळच्या सभेत मोदींना जाब विचारा; ठाकरे गटाचा हल्लाबोल