अकोला : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज 'मन की बात'मधून अकोल्यातल्या 'मराठा हॉटेल'च्या मालकाचंही तोंडभरुन कौतुक केलं. नोटाबंदीनंतर हॉटेलचालक मुरलीधर राऊत यांनी गिऱ्हाईकांकडे सुट्टया पैशांचा आग्रह धरला नव्हता. सुट्टे पैसे नसतील तर नंतर पैसे आणून द्या, असा उपक्रम राबवत त्यांनी अनेक गरजूंना जेवू घातलं. त्यांच्या या उपक्रमाची बातमी 'एबीपी माझा'नं पहिल्यांदा दाखवली होती.
नोटाबंदीमुळे लोकांच्या जेवणाचेही वांधे झाले. हीच अडचण लक्षात घेऊन बाळापूरच्या मुरलीधर यांनी आपल्या हॉटेलवर बोर्ड लावला.
'पैसे नसले तरी भरपेट जेवा... आणि जेव्हा मिळतील... तेव्हा देऊन जा...'
मुरलीधर राऊत यांच्या घरी, आज जणू दिवाळीच आहे... आणि त्याला कारण ठरला आहे... तो त्यांचा दिलदारपणा. 'एबीपी माझा'सह सोशल मीडियावरही मुरलीधर राऊत झळकले आणि त्यांची कीर्ती थेट मोदींपर्यंत पोहोचली. देशाच्या पंतप्रधानांच्या मुखी आपल्या धन्याचं नाव ऐकल्यानं भारावलेल्या बायकोनं त्यांना आज चक्क ओवाळलं.
अन्नदाता सुखी भवः असं म्हणतात... अडचणीच्या काळात धाऊन जाणारे मुरलीधर हे खऱ्या अर्थाने अन्नदाता आहेत. जे फायद्यापेक्षा माणसांच्या समाधानाला महत्त्व देतात. ही आहे त्यांच्या 'मन की बात'