मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. मोदी नाशिक आणि मुंबई दौरा करणार आहे. नाशिकमध्ये (Nashik) पंतप्रधान मोदींची भव्य सभा पार पडणार आहे. तर मुंबईच्या (Mumbai) घाटकोपरमध्ये (Ghatkopar) त्यांचा भव्य शो पार पडणार आहे. दिग्गज नेते प्रचारात उतरल्याने लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. पंतप्रधान मोदी नाशिक आणि घाटकोपरमध्ये उमेदवाराचा जोरदार प्रचार करणार आहेत. पंतप्रधान मोदी सकाळी नाशिक दौऱ्यावर आहेत, त्यानंतर संध्याकाळी मुंबईत पोहोचतील.


नाशिकमध्ये पंतप्रधानांची सभा आणि रोड शो


दिंडोरी, धुळे आणि नाशिक मतदारसंघातील लोकसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वी प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. महाविकास आघाडीही नाशिकमध्ये रोड शो आणि सभा घेत जोरदार प्रचार करणार आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या नाशिकमध्ये सभा होणार आहे. नाशिकमध्ये दिग्गज नेत्यांच्या आगमनामुळे लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील प्रचाराच्या पार्श्वभूमीनर राजकारण तापणार आहे.


पाचव्या टप्प्यातील निवडणुकांचा रणसंग्राम


20 मे रोजी मुंबई, ठाणे, कल्याण, नाशिक, धुळे आणि दिंडोरी मतदारसंघात पाचव्या टप्प्यातील निवडणुका होणार आहेत. नाशिक, धुळे आणि दिंडोरी हे महाविकास आघाडी आणि महायुतीसाठी महत्त्वाचे मतदारसंघ आहेत. यामुळे या तीन लोकसभा मतदारसंघात विजय मिळवण्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीने कंबर कसली आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी महायुतीच्या प्रचारासाठी नाशिकच्या पिंपळगाव बसवंत कांदा बाजारातील सभेला संबोधित करणार आहेत. त्याच दिवशी शरद पवार दिंडोरी आणि नाशिकमध्येही सभा घेणार आहेत. तर नाशिकच्या हुतात्मा कान्हेरे मैदानावर महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची सभा पार पडणार आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे दोघेही एकाच व्यासपीठावरून प्रचार करणार आहेत. 


याशिवाय भाजपचे ट्रबलशुटर समजले जाणारे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हेही महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी पुढील आठवड्यात नाशिकला पोहोचणार आहेत.  येत्या चार-पाच दिवसांत नाशिकचे राजकारण तापताना दिसणार आहे. 


मुंबईत पंतप्रधानांचा भव्य रोड शो


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबईत भव्य रोड शो होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुधवारी, 15 मे 2024 रोजी मुंबईत रोड शो करणार भाजप महायुतीचे मुंबई उत्तर पूर्व लोकसभेचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्यासाठी घाटकोपर येथे रोड शो घेणार आहेत. भव्य अशा स्वरूपाचा रोड शो आयोजित केला असल्याचे कोटेचा यांनी सांगितले. 


संध्याकाळी साडे सहा वाजता मोदींचे विक्रोळी येथे आगमन होईल. रोड शो हा 6.45 मिनिटांनी सुरू होईल आणि 7.45 ला संपेल. घाटकोपर पश्चिम येथे एलबीएस मार्गावरील दामोदर पार्क जवळील अशोक सिल्क मिल येथून हा रोड शो सुरू होऊन तो एम जी रोड वरून श्रेयस टॉकीज, सर्वोदय सिग्नल, संघवी स्केवर ते घाटकोपर पूर्व मध्ये रामजी असर शाळेजवळील पार्श्वनाथ मंदिर चौक येथे संपेल. 


मोदींच्या मुंबईतील रोड शोमुळे मुंबईचा LBS मार्ग दुपारी 2 ते 10 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. तसेच, मेघराज जंक्शन ते माहुल घाटकोपर रोडवरील आरबी कदम जंक्शनपर्यंत उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील दोन्ही वाहतूक दुपारी 2 ते रात्री 10 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी 14 आणि 15 रोजी संपूर्ण एलबीएस मार्गावर आणि एलबीएस मार्गाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यापासून 100 मीटर अंतरापर्यंत नो पार्किंग लागू केले आहे.