मुंबई : जीव जायचाच असेल तर तो कसाही जातोच... काळाने गाठलंच असेल तर त्यातून काहीच सुटका नाही. काही ना काही निमित्त येतं आणि नियती आपला डाव साधते. घाटकोपरच्या दुर्घटनेत सचिन यादव नावाच्या युवकाला असंच काळाने गाठलं. घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटनेत सचिन यादव या तरुणाचा करुण अंत झाला. दीड वर्षांपासून छेडानगर परिसातील पट्रोल पंपावर कामावर असणारा सचिन होर्डिंग कोसळण्याच्या अगदी 10 मिनिटेच आधी तिथे आला होता आणि त्याला जीव गमवावा लागला. सचिनच्या आयुष्यातील ती शेवटची दहा मिनिटं हादरवणारी आहेत. कामावर येण्याची वेळ आणि अपघाताची वेळ जुळून आली... तिथेच 20 वर्षांच्या सचिनचा दुर्देवी अंत झाला.
सोमवारी दुपारी पावसाचे ढग जणू काही मृत्यूच घेऊन आले होते. पावसाने मुंबईची दाणादाण उडाली होती. कुठे पाऊस, कुठे वारा, कुठे धुळीचं वादळ, सारं काही हादरवणारं घडत होतं. 60 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या धुळीच्या वादळाचा मोठा तडाखा बसला.
घाटकोपरमधील पेट्रोल पंपावर जणू मृत्यूच कोसळला. सोसाट्याच्या वाऱ्याने छेडानगर परिसात पट्रोल पंपावर महाकाय होर्डिंग कोसळलं अन् 14 जण जागीच ठार झाले. या घटनेनं फक्त 14 जणांचा जीवच गेला नाही तर 14 कुटुंब हादरून गेलेत.
सचिन यादव हा पेट्रोल पंपावर कामावर होता. सचिनची सोमवारी सेकंड शिफ्ट होती. नेहमीप्रमाणे तो कामावर रुजू झाला. काम सुरू करुन जेमतेम 10 मिनिटं झाली होती.
पण अगदी 10 मिनिटात परिसरातील 100 ते 120 फूट उंच होर्डिंग होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळला. जर सचिन दहा मिनिटानंतर कामावर आला असता तर तो कदाचित आज तो जिवंत असता. सचिन कामावर आल्यानं त्याचा सहकारी घरी गेला अन् थोडक्यात वाचला. पण सचिनला मृत्यूने गाठलं.
महाकाय होर्डिंगखाली जवळपास 100 लोक दबली होती. त्यातील 14 जणांना आपला जीव गमवावा लागला तर अनेकजण जखमी झाले. त्यात सचिनही चिरला गेला. सचिन अगदी 20-22 वर्षांचा. दोन वर्षांपूर्वी त्याचं लग्न झालेलं. सचिनला 4 महिन्यांचं बाळ आहे. सचिनच्या कुटुंबीयांवर तर दुखाचा डोंगर कोसळलाय. कुटुंबात सचिन घरात एकटाच कमावता होता. त्याच्यावर संपूर्ण कुटुंबाचा भार होता. त्याच्या अशा अचानक जाण्याने कुटुंबाचा आधार गेलाय.
चौकशीनंतर दोषींना शिक्षा मिळेलही, पण गेलेले निष्पाप जीव पुन्हा परत कधीच येणार नाही.
ही बातमी वाचा: