मुंबई: राजभवन येथील ब्रिटिशकालीन बंकरमध्ये 'क्रांती गाथा' या भूमिगत दालनाचे उद्घाटन हा एक योगायोग नाही तर चांगला मुहूर्त असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. क्रांती दालानेचे तसेच जलभूषण या नवीन इमारतीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन झालं. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास राज्यपाल भगतसिंह कोशारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री आदिती तटकरे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील सदस्य इतर मान्यवर उपस्थित होते.


यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  म्हणाले की, "ज्या कार्यक्रमासाठी आज आपण जमलो त्या आधी तीन महिन्यापूर्वी दरबार हॉलचे लोकार्पण राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आले. आज मा. पंतप्रधान आले आहेत. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करतांना क्रांती गाथा दालनाचे उद्घाटन हा एक योगायोगच नाही तर एक चांगला मुहूर्त आहे."


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, "जे स्वातंत्र्य उपभोगतो आहोत त्यासाठी किती जणांनी आपल्या घरादारावर निखारे ठेवले, किती जणांनी बलिदान दिलं, कितीजणांनी मरण यातना सोसल्या,  क्षणभर विचार केला हे असं घडलं नसतं तर  आपण हे स्वातंत्र्य उपभोगू शकलो असतो का हा प्रश्न मनात येतो. आपल्याला स्वातंत्र्य असंच नाही मिळाले, ते कुणी आपल्याला आंदण नाही दिलं हे स्वातंत्र्य आपल्याला लढून मिळवावं लागलं आहे. तो इतिहास नुसता जतन नाही तर जिवंत करणं हे आपलं काम आहे. काळ पुढे जात आहे. आपण पारतंत्र्यात 150 वर्षे होतो आता  स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली, पुढे जात असतांना हा वारसा पुढच्या पिढीला देण्याच काम केलं नाही तर मला वाटतं आपण आपल्या कर्तव्याला मुकतो आहोत. आज एक अप्रतिम काम आपण करत आहोत."


सन 2016 साली राजभवनातील हे भुयार सापडले. खंदक आणि भुयाराचा आज अप्रतिम उपयोग होतो आहे. तत्कालीन राज्यपाल विद्यासागर राव यांनी हे भुयार बघण्यास बोलावलं होतं असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. 


महाराष्ट्रदिनी आपण एक पुस्तक प्राथमिक स्वरूपात तयार केलं आहे अजून ते पूर्ण व्हायचं आहे. ज्ञात अज्ञात क्रांतीकारकांची माहिती गोळा होतेय असं उद्धव ठाकरे म्हणाले. ते म्हणाले की, "नुसतं बोलत बसण्यापेक्षा क्रांतीकारकांनी ज्या गोष्टी केल्या, त्यांच्या त्यागाच्या एक कण जरी काम आपण करू शकलो तरी त्यांचे बलिदान कृतार्थ होईल. जल भूषण या राज्यपालांच्या निवासस्थानाचे लोकार्पणही आज होत आहे. काळ बदलत असला तरी या  परिसराने इतिहासाच्या पाऊलखुणा नेहमीच जपल्या आहेत.  त्याला धक्का न लावता नुतनीकरण करणं, आधुनिक तंत्रज्ञानं हे काम करणं खूप मोठी गोष्ट. कलात्मक नजरेने याकडे पहातांना प्रत्येक ठिकाणी त्याचे सौंदर्य दिसते. इतक्या चांगल्याप्रकारे हे नुतनीकरणाचे काम करण्यात आले आहे."