PM Narendra Modi In Dehu: वाल्मिकींनी रामायणात रामाच्या ज्या ठिकाणांचा उल्लेख केला आहे.  त्या सगळ्या ठिकाणांचा विकास केला जाणार आहे. भारतातील सर्व धार्मिक स्थळांचा विकास करुन त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं पर्यटन स्थळ करण्याचं कार्य सुरु आहे. आपल्या संस्कृतिची शिकवण देशातच नाही तर बाहेर देशातील नागरिकांना कळावी, हा या मागचा हेतू आहे, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. ते देहूत वारकऱ्यांना संबोधित करताना बोलत होते.


अयोद्धेत राम मंदिर होत आहे. काशीविश्वनाथाचं मंदिर देखील तयार होत आहे. भारताच्या प्रत्येक धार्मिक स्थळांचा विकास केला जात आहे. वाल्मिकींनी रामायणात रामाच्या ज्या ठिकाणांचा उल्लेख केला आहे.  त्या सगळ्या ठिकाणांचा विकास केला जाणार आहे. या आठ वर्षात बाबासाहेब आंबेडकारांच्या पंचतीर्थांचा विकास केलाआहे. लंडनचं घर, चैत्यभूमी, दिक्षाभूमी या सगळ्या पंचतीर्थांमुळे बाबासाहेबांची शिकवण अनेकांपर्यंत पोहचत आहे, असं म्हणत त्यांनी धार्मिक स्थळांच्या विकासाबाबत भाष्य केलं.


अभंगाच्या ओळी म्हणत केली भाषणाला सुरुवात


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेहमीप्रमाणे हटके पद्धतीने भाषणाची सुरुवात केली. अभंगाच्या ओळी म्हणत त्यांनी भाषणाला सुरुवात केली. त्यानंतर वारकऱ्यांच्या अनेक प्रश्नांवर भाष्य केलं. पालखी मार्गाच्या कामाचा आढावा घेतला. या शिळा मंदिराचं लोकार्पण करण्याची संधी मला मिळाली याबाबत मी स्वत:ला भाग्यशाली समजतो, असंही ते म्हणाले.


भारतातील संत परंपरेमुळे आज भारत एकजुट आहे. संत नामदेव, एकनाथ, गोरोबा काका, संत चोखामेळा यांच्या अभंगामुळे कायम प्रेरणा मिळते. मानवांमध्ये भेदभाव न करण्याच्या त्यांचा संदेश फक्त भक्तीसाठी नाही तर राष्ट्र भक्ती आणि समाज भक्तीसाठी आहे.  याच संदेशावरुन आपले वारकरी प्रत्येक वर्षी पंढरपूरची यात्रा करतात. सरकारच्या प्रत्येक योजनेचा लाभ बिना भेदभावाने मिळतो आहे, असंही ते म्हणाले


दलित, वंचित, आदिवासी, गरिब मजूर यांची सेवा ही देशाची पहिली जबाबदारी आहे. समाजाला गती देण्यासाठी संत मंडळींनी कायम पुढाकार घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात देखील तुकाराम महाराजांनी महत्वाची भूमिका निभावली. सावकरांनी शिक्षा झाली तेव्हा ते देखील तुकारामांचे अभंग गात होते. प्रत्येक कालखंडात संतांची महिमा कायम राहिली आहे. भारताची प्रत्येक यात्रा एक भारत श्रेष्ठ भारताचा संदेश दिला आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं.