नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चंद्रपूर जिल्ह्यातील कोराडी आणि परळीतील 3 औष्णिक वीजप्रकल्पातील नवीन उर्जासंचांचं लोकार्पण केलं आहे. पंतप्रधान आज नागपूर दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात पंतप्रधानांनी विविध विकासकामांचं भूमिपूजन केलं आहे. तसंच आधार पे योजनेचीही सुरुवात पंतप्रधानांनी केली आहे. यावेळी मोदींनी कोराडी थर्मल प्लांटची पाहणी केली आहे.


आपल्या दौऱ्यात नरेंद्र मोदींनी आयआयटी, आयआयएमसारख्या शैक्षणिक संस्थांचंही भूमिपूजन केलं आहे. तसंच म्हाडाच्या नव्या गृहनिर्माण योजनेचीही सुरुवात आजपासून करण्यात आली आहे.

मोदींच्या नागपूर दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, प्रकाश जावड़ेकर, पीयूष गोयल, रविशंकर प्रसाद, चद्रशेखर बावनकुळे, हंसराज अहीर, गिरीश महाजन, रामदास आठवले, प्रकाश मेहता, शिवसेना खासदार कृपाल तुमाने आदी नेतेही पंतप्रधानांसोबत होते.

या संस्थांचं भूमिपूजन

Indian institute information technology : नागपुर जवळ मौजे वारंगा या ठिकाणी 98 एकर जागेत आयआयटी तयार होणार आहे. देशात अशाप्रकारे 20 आयआयटी उभारली जात आहेत.

Indian institute of management : नागपूरमध्ये IIM अहमदाबादच्या मदतीने नवीन इंस्टिट्यूट सुरु होणार आहे. या प्रकल्पाचं भूमिपूजन आज मोदींच्या हस्ते करण्यात आलं आहे. IIM नागपुरला मिहान प्रकल्पात 35 एकर जागा देण्यात आली आहे.

All India institute of medical sciences : दिल्लीतील एम्सच्या धर्तीवर नागपुरात मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल उभारलं जाणार आहे. या हॉस्पिटलला मिहान परिसरात 150 एकर जागा मिळाली आहे. इथे ही 260 बेड्सचं अत्याधुनिक हॉस्पिटल बनणार आहे. 960 कोटींच्या खर्च या हॉस्पिटलसाठी अपेक्षित आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील कोटयवधी नागरिकांना स्वस्त आणि दर्जेदार वैद्यकीय सोयी मिळणार या हॉस्पिटलच्या माध्यमातून मिळणार आहेत.

'आधार पे'चं पंतप्रधानांकडून लोकार्पण

पंतप्रधान मोदींनी आपल्या नागपूर दौऱ्यात 'आधार पे'चं लोकार्पण केलं आहे. आधार पेच्या माध्यमातून आपला आधार क्रमांक वापरुन आता आर्थिक व्यवहार करणं शक्य होणार आहे.

काय आहे आधार पे?

‘आधार पे’च्या माध्यमातून केवळ अंगठ्याच्या ठशाच्या मदतीने तुम्ही पेमेंट करु शकाल.

यासाठी तुमचं बँक खातं आधार संलग्न असणं आवश्यक आहे. सोबतच तुमचा आधार क्रमांकही तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. ‘आधार पे’ फिंगरप्रिंट सेंसरशी जोडलेलं असेल. विशेष म्हणजे प्लॅस्टिक मनी किंवा मोबाईल अॅपची आवश्यकता नसेल.

अंगठाच होणार 'आधार', मोदी 'आधार पे'चा शुभारंभ करणार


भीम अॅप पेक्षा काहीशी वेगळी असलेली ही योजना मुख्यत्वे दुकानदारांसाठी असेल. ग्राहकांकडे स्मार्टफोन नसला तरी बायोमॅट्रिक स्कॅनच्या मदतीने पेमेंट करणं शक्य होणार आहे. पुढच्या सहा ते नऊ महिन्यांच्या कालावधीत 70 टक्के दुकानांमध्ये आधार पे सुरु करण्याचं लक्ष आहे.

Housing for all योजना

2022 पर्यंत महाराष्ट्रातील सर्व गरिबांना त्यांचं हक्काचं घर मिळावं म्हणून नव्या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. म्हाडा या योजनेतील घरांची निर्मिती करणार आहे. राज्यात 21 ठिकाणी म्हाडाच्या माध्यमातून गृहनिर्माण प्रकल्प सुरु होणार आहेत.

पोस्टल स्टँपचंही अनावरण

दीक्षाभूमिवर आधारित पोस्टल स्टँम्पचं प्रकाशन आज मोदींच्या हस्ते करण्यात आलं आहे.