अहमदनगर : राज्यासह देशात सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. अहमदनगर जिल्ह्यासह अनेक जिल्ह्यात कोरोनाबधित रुग्णांसाठी लागणाऱ्या ऑक्सिजनचा देखील मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. आशा परिस्थितीत अहमदनगरमधील एक डॉक्टरने ऑक्सिजन निर्मितीसाठी अनोखा उपक्रम राबवला आहे. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना देण्यात येणाऱ्या औषधाच्या चिठ्ठीवर 'बरे झाल्यावर एक झाड लावा' असा संदेश लिहून दिला आहे. 


अहमदनगरमधील वाळकी या गावात असलेले संजीवनी हॉस्पिटलमध्ये डॉ. युवराज कासार रुग्णांवर उपचार करतात. मात्र सध्याची कोरोनाची आणि ऑक्सिजनची परिस्थिती पाहून डॉक्टर युवराज कासार यांनी एक अनोखा उपक्रम राबवला आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यात ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. इतकेच नाही तर अहमदनगरसह अनके जिल्ह्यांमध्ये देखील ऑक्सिजनची कमतरता दिसून आली. त्यामुळे या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून डॉ. युवराज कासार यांनी ऑक्सिजन निर्मितीचा संदेश देण्यासाठी नामी शक्कल लढवली आहे. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना उपचार केल्यानंतर औषधांची चिट्ठी देताना त्या चिठ्ठीवर 'बरे झाल्यानंतर एक झाड तरी लावा, त्यामुळे तूम्हाला ऑक्‍सिजन कमी पडणार नाही" असा संदेश लिहून दिला आहे.




डॉक्टरांनी दिलेल्या संदेशाचे रुग्णांना देखील नवल वाटले. मात्र त्याचं गांभीर्य लक्षात आल्यामुळे रुग्णांनी देखील बरे झाल्यानंतर झाडं लावणार असल्याचा निर्धार केला आहे. सध्याची राज्यातील ऑक्सिजनची परिस्थिती पाहता ऑक्सिजनचे महत्व किती आहे हे सर्वांनाच कळले आहे. मात्र झाडं लावल्याने देखील ऑक्सिजनची निर्मिती होऊ शकते, असा महत्वपूर्ण संदेश डॉ. युवराज कासार यांनी दिला आहे. त्यामुळे त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.


संबंधित बातम्या