बीड : नाशिकमध्ये ऑक्सिजनची गळती होऊन लोकांना प्राण गमवावे लागले तर अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयांमध्ये सुद्धा ऑक्सिजन संपल्याने सहा लोकांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाइकांनी केला होता. आता तिसरी घटना समोर आली आहे, ती म्हणजे बीड मधील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अचानक ऑक्सिजनचा पुरवठा कोणीतरी बंद केला. त्यामुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे.


बीडच्या जिल्हा रुग्णालयातील प्रकार 
बीड येथील जिल्हा रुग्णालयातील कोविड वार्डात व्यवस्थापनाचा अनागोंदी कारभार रुग्णांच्या जीवावर बेतत आहे. काल मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने येथील ऑक्सिजन पुरवठा बंद केल्याचा प्रकार समोर आला. यात दोन रुग्ण दगावले आहेत. दरम्यान रुग्णालय प्रशासनाने ऑक्सिजन पुरवठा बंद केला गेल्याचे मान्य केले असले तरी रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजन अभावी झाल्याचे मात्र मान्य केले नाही.


बीड जिल्हा रुग्णालयामध्ये आता कोविड हॉस्पिटल सुरू करण्यात आले याच हॉस्पिटलमध्ये वार्ड क्रमांक सातमध्ये रात्री साडेअकरा ते बाराच्या दरम्यान प्लांटमधून होणारा ऑक्सिजन सप्लाय कॉक कुणीतरी बंद केला आणि यानंतर व्हेंटिलेटरवर असणाऱ्या एका रुग्णांचा मृत्यू झालाय.


Corona India | ऑक्सिजन अभावी दिल्लीत 20 तर अमृतसरमध्ये 5 रुग्णांचा मृत्यू


यासंदर्भात बीड सिव्हिल हॉस्पिटलचे आरएमओ डॉक्टर सुखदेव राठोड यांनी सांगितले की प्लांटमधून येणाऱ्या ऑक्सिजन सोबतच जम्बो सिलेंडर आम्ही रुग्णांना लावत असतो आणि ते सिलेंडर चालू होते, ही घटना घडल्याचे जरी खरे असले तरी रुग्णाचा मृत्यू ऑक्सिजन कमी पडल्यामुळे झाला नाही. कारण, ती घटना घडल्यानंतर बऱ्याच काळाने रूग्ण दगावला असल्याचे राठोड यांनी सांगितलय.


एकूणच बीडच्या आरोग्य प्रशासनाने काही काळापुरता ऑक्सिजन सप्लाय बंद झाला असल्याचे मान्य केले एवढेच नाही तर या संदर्भात चौकशी अहवाल तयार करण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले. यात जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल. मात्र, अशा प्रकारचा हलगर्जीपण आरोग्य प्रशासन कसं काय खपवून घेते याविषयी मात्र आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय.