Oxygen Express in Nashik विशाखापट्टणमहून निघालेली 'ऑक्सिजन एक्सप्रेस' अखेर (आज) शनिवारी नाशिकला पोहोचली आहे. यामुळं राज्याला एक मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढत असतानाच ऑक्सिजचा तुटवडा जाणवू लागल्यामुळं आरोग्य विभाग आणि प्रशासनापुढे अनेक अडचणी उभ्या राहिल्या आहेत. पण, नाशिकला आता ही ऑक्सिजन एक्स्प्रेस आल्यामुळं एक प्रकारे काही अंशी दिलासाच मिळत आहे. 


नाशिकला आलेल्या या एक्स्प्रेसमध्ये ऑक्सिजनचे एकूण 4 टँकर आहेत. यापैकी 2 टँकर नाशिक जिल्हा आणि 2 नगर जिल्ह्याला पाठवण्यात येणार आहेत. नाशिकमध्ये मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. ऑक्सिजनअभावी रुग्णालयांमध्ये बेडही उपलब्ध होत नाही आहेत. तर, काही रुग्णालय व्यवस्थापनांकडून रुग्णांना दुसऱ्या ठिकाणी हलवण्यासही सांगण्यात येत आहे. 


नाशिक जिल्ह्यात सध्याच्या घडीला साडेसात ते आठ हजार रुग्णांना ऑक्सिजनची गरज आहे. या धर्तीवर दररोज जवळपास 140 मेट्रिक टनच्या घरात ऑक्सिजनचा पुरवठा होणं आवश्यक आहे. पण, सध्या फक्त 85 मेट्रिक टन ऑक्सिजनचाच पुरवठा होत आहे. ही तफावत फार मोठी असल्यामुळं रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा करायचा तरी कसा, हाच प्रश्न प्रशासनाला पडतो. 


Mumbai Lockdown | मुंबईत वाहनांवरील रंगीत स्टीकर्सचा नियम रद्द, तपासणी मात्र सुरुच राहणार 


नाशिकमध्ये आलेल्या या ऑक्सिजन टँकरपैकी दोन टँकर एकट्या नाशिक जिल्ह्याला मिळणार आहेत. म्हणजेच इथं एकूण  50 मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा होणार आहे. हा पुरवठा साधारण एक दिवस पुरेल इतकाच आहे. पण, अडचणीच्या या प्रसंगी हा पुरवठाही महत्त्वाचा ठरत आहे, ज्यामुळं यंत्रणांना किमान दिलासाही मिळाला आहे. 


काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये मोठी दुर्घटना... 


नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनच्या टँकमध्ये अचानक गळती झाली होती. या ऑक्सिजन गळतीच्या घटनेत 24 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली. राज्यभरात एकीकडे ऑक्सिजनचा तुटवडा असताना नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली. ऑक्सिजनच्या टँकमध्ये अचानक गळती झाली. 13 KL क्षमतेचा हा ऑक्सिजन टँक होता. ऑक्सिजन टँकरमध्ये गळती झाल्याने तो सर्वत्र पसरला, या गळतीनंतर ऑक्सिजन पुरवठा तब्बल अर्धा तास खंडित झाला होता.