औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महिन्याभरातच महाराष्ट्रातील 48 खासदारांपैकी 15 खासदारांच्या निवडीला आव्हान देणाऱ्या याचिका उच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत. यापूर्वीही महाराष्ट्रातील अनेक आमदारांच्या आमदारकीला आव्हान देणाऱ्या याचिका दाखल झाल्या आहेत. आता त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळही संपत आला आहे. मात्र अद्यापही त्या याचिका न्यायप्रविष्टच आहेत. त्यामुळे निवडणुका झाल्या की याचिका दाखल होतात, मात्र ज्या नेत्याच्या विरोधात अशा याचिका दाखल होतात त्यांचा कार्यकाळ संपून जातो. पण निकाल काही लागत नाही, अशी काहीशी परिस्थिती आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी एमआएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी दोन धर्मात तेढ निर्माण करणारी भाषणे औरंगाबाद लोकसभेमध्ये वायरल केली. धर्माच्या नावावर मते मागितली म्हणून औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे.
औरंगाबाद खंडपीठात केवळ इम्तियाज जलीलच नाही, तर मराठवाड्यातल्या सात आणि नंदुरबारच्या एक अशा एकूण आठ खासदारांच्या विरोधात 9 याचिका दाखल झाल्या आहेत. यामध्ये भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका आणि बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांच्यावर अपक्ष उमेदवार कालिदास आपेट यांनी शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप करत याचिका दाखल करण्यात आली आहे. याशिवाय अन्य याचिकाही दाखल करण्यात आल्या आहेत. हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील, परभणीचे संदेश जाधव यांच्या विरोधात, लातूरचे नवनिर्वाचित खासदार आमदार सुधाकर श्रृंगारे यांच्याविरोधात प्रत्येकी एक याचिका दाखल केली आहे .
नंदुरबारच्या खासदार हिना गावित यांच्या निवडीलादेखील औरंगाबाद खंडपीठामध्ये आव्हान देण्यात आले आहे. या सगळ्या याचिका लोक प्रतिनिधित्व अधिनियम 1951 सेक्शन 81 अंतर्गत दाखल करण्यात करण्यात आल्या आहेत.
मराठवाडाच नाही तर विदर्भातील सात खासदारांच्या खासदारकीला नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आलं आहे. प्रचारादरम्यान नितीन गडकरींनी निवडणूक आयोगाने दिलेल्या नियमांचे पालन केले नसल्याचा आरोप करत निवडणूक रद्द करावी अशी मागणी आहे. याशिवाय अशोक नेते, सुनील मेंढे, रामदास तडस, कृपाल तुमाने, प्रतापराव जाधव आणि महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांच्या खासदारकीला देखील आव्हान देण्यात आलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील 48 खासदारांपैकी 15 खासदारांच्या विरोधात औरंगाबाद आणि नागपूर खंडपीठात मध्ये याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.
निवडणूक झाल्या की अशा याचिका दाखल होतात. विधानसभा निवडणुकीनंतर आमदारकी रद्द करण्याच्या अनेक याचिका महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या खंडपीठात दाखल झाल्या. त्यात अर्जुन खोतकर यांची आमदारकी औरंगाबाद खंडपीठाने रद्द केली होती. मात्र आता त्यांचा कार्यकाळ संपत आला आहे. तरीही याचिका सुप्रीम कोर्टात न्यायप्रविष्ट आहे.
महाराष्ट्रातील 48 खासदारांपैकी 15 खासदारांची निवडणूक रद्द करावी म्हणून वेगवेगळ्या खंडपीठात याचिका दाखल झालेल्या आहेत. याचिका दाखल होतात, वर्षानुवर्षे खटले चालतात, बहुतेक वेळा त्याच्या खासदारकीचा-आमदारकीचा कार्यकाळदेखील पूर्ण होतो. मात्र तरीदेखील याचिकांचा निकाल लागत नाही.
लोकसभा निवडणुकीच्या महिन्याभरात राज्यातील 15 खासदारांच्या निवडीला हायकोर्टात आव्हान
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Jul 2019 06:06 PM (IST)
महाराष्ट्रातील 48 खासदारांपैकी 15 खासदारांची निवडणूक रद्द करावी म्हणून वेगवेगळ्या खंडपीठात याचिका दाखल झालेल्या आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -