उस्मानाबद : राज्य सरकार निवडणुकीत व्यस्त झाल्याने शेतकऱ्यांचे तूर खरेदी करण्यासाठीची रिकामी पोती संपली आहेत. आवक वाढल्यानं गोदाम फुल्ल झाली आहेत. ज्यांनी महिनाभरापूर्वी तूर विकली त्या शेतकऱ्यांचे पैसे लटकले आहेत.
नाशिकमध्ये कांदा परराज्यात पाठवण्यासाठी रेल्वे रॅक उपलब्ध होत नसल्यानं नांदगावात व्यापाऱ्यांनी बेमुदत कांदा मार्केट बंद केलं आहे. येवल्यातल्या एका शेतकऱ्यांना पाच एकर कांदा पेटवून दिला.
निवडणुकांमुळे सरकार जागेवर नाही. राज्यभरातल्या सुमारे 1 हजार तूर खरेदी केंद्रावरचा बारदाणा संपला आहे. माल खरेदी करण्यासाठी पोतीच शिल्लक नाहीत. खरेदी केंद्रावर तुरीचे ढिग लागले आहेत. तूर खरेदी केंद्र सरकारने जाहीर न करताच बंद झाली आहेत. काही ठिकाणी शेतकऱ्यांची कुलूप ठोकलं आहे.
व्यापारी तुरीची हमी भावापेक्षा कमी दरानं खरेदी करत होते. म्हणून निवडणुकांच्या तोंडावर फडणविसांनी ठरवलं, सरकार 5 हजार 50 दरानं तूर खरेदी करेल. पण त्यासाठीचं नियोजन निवडणुकांमुळे कोलमडलं आहे. गावखेड्यात सरकारविरोधी वातावरण तयार झाल आहे.
सुरेश माने आणि नानासाहेब कदम यांनी महिनाभरापूर्वी सरकारला तूर विकली होती. व्यापाऱ्यांना तूर विकली असती, तर लिलाव होऊन 24 तासात पैसे मिळाले असते. पण सरकारला तूर विकून महिना उलटला, तरी नानासाहेब आणि सुरेशसारख्या हजारो शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत.
मराठवाड्यात तूर, नाशिकमध्ये कांद्याचं पीक जोमात आलं आहे. लगेच दर पडले. नाशिक जिल्ह्यातून कांदा परराज्यात पाठवण्यासाठी रेल्वेने रॅक दिले नाहीत. कांदा साठवण्यासाठी व्यापाऱ्यांकडे जागा शिल्लक नाही. त्यामुळे नांदगाव बाजार समितीनं कांदा मार्केट बेमुदत बंद केलं आहे.
कांदा काढणीचाही खर्च निघत नसल्याने येवला तालुक्यातल्या नगरसुलच्या कृष्णा डोंगरेंनी पाच एकरातला कांदा काल शेतात ठिकठिकाणी आग लावून पेटवून दिला.
डोंगरेंचा कांदा जळत होता. त्याचवेळी सरकार, त्यांचे मित्र, सरकारचे विरोधक असे सर्वजण निवडणुकीत व्यस्त होते. नेत्यांची हेलिकॉप्टर्स आकाशातून भिरभिरत आहेत.