Satara doctor suicide case: पोलिस आणि राजकारण्यांच्या अभद्र युतीमध्ये मुळच्या बीड जिल्ह्यातील आणि सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा हकनाक बळी गेला. शवविच्छेदन अहवाल बदलून देण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप करत तसेच फलटण ग्रामीण पोलिस स्टेशनचा पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदनेनं चारवेळा (Gopal Badne police inspector rape allegation) बलात्कार केल्याची नोंद हातावर लिहित महिला डाॅक्टरने नामांकित हाॅटेलमध्ये आत्महत्या केली. हातावरील सुसाईड नोटमध्ये गोपाळसह त्याचा साथीदार प्रशांत बनकरने गेल्या चार महिन्यांपासून छळ केल्याचा उल्लेख केला आहे. या सुसाईड नोटनंतर या प्रकरणाला वाचा फुटली गेली. त्यानंतर महिला डाॅक्टरकडून गेल्या पाच महिन्यांपासून पोलिस आणि राजकारण्यांच्या मोगलाईला कंटाळून केलेले तक्रार अर्जही आता सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. यामध्ये डीवायएसपींना लिहिलेल्या दोन अर्जांचा आणि जिल्हा रुग्णालयाला लिहिलेल्या एका अर्जाचा समावेश आहे.
कारवाई झाली नसल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित
व्हायरल झालेल्या तीन अर्जांमध्ये संबंधित महिला डॉक्टरनं आपल्या जीवाचं बरं वाईट झाल्यास पोलीस जबाबदार असतील असेही म्हटलं असतानाही कारवाई करावी, असे ना संबंधित यंत्रणेला वाटले ना डीवायएसपींना. त्यामुळे गेल्या पाच महिन्यांपासून घडणाऱ्या घटनांनी व्यथित होऊन गेल्याचे दिसून येते. एका अर्जामध्ये उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर धुमाळ यांचा सुद्धा उल्लेख आहे. त्यांच्याकडूनही कारवाई झाली नसल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. त्यामुळे राजकारणी आणि पोलिसांच्या अभद्र युतीमध्ये एका महिला डॉक्टरचा बळी गेल्याने संतापाची लाट उसळली आहे.
डॉक्टर युवतीकडून सात ते आठ जणांविरोधात तक्रार
दरम्यान व्हायरल झालेल्या तीन अर्जामध्ये संबंधित डॉक्टर युवतीकडून सात ते आठ जणांविरोधात तक्रार करण्यात आली आहे. सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेल्या अर्जांमध्ये पहिला तक्रार अर्ज 19 जून 2025 रोजीचा आहे. या अर्जामध्ये संबंधित डॉक्टर युवतीकडून फलटणचे डीवायएसपींच्या नावाने अर्ज लिहिण्यात आला आहे आणि या संदर्भात त्यांनी आरोपी फिट नसताना देखील 'मॅडम फिट द्या' असा दबाव आणल्याचा यामध्ये उल्लेख करण्यात आला आहे. याबाबत पोलीस निरीक्षकांना माहिती दिली होती. मात्र, त्यांनी सुद्धा उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे अर्जामध्ये उल्लेख आहे. त्यांनी पोलिस उपअधीक्षकांनी लक्ष घालून कारवाई करावी अशी मागणी केली होती. या अर्जाला पोहोच सुद्धा घेतली आहे.
अन्य एका व्हायरल अर्जामध्ये माहिती अधिकार अंतर्गत मागवलेला अर्ज आहे. यामध्ये डीवायएसपी कार्यालयाकडे तक्रार अर्ज दाखल केल्यानंतर कोणती कारवाई करण्यात आली याची मागणी करणारा हा अर्ज आहे. त्यांनी 13 ऑगस्ट 2025 रोजी या संदर्भात माहिती मागवली आहे. सोबत त्यांनी 19 जून 2025 रोजी केलेल्या अर्जाची प्रत सुद्धा जोडली आहे. तिसरा अर्ज चौकशी समिती, जिल्हा रुग्णालय, सातारा यांना जो अहवाल सादर केला आहे या संदर्भातील आहे. या अर्जामध्ये प्रामुख्याने पोलीसांविरुद्ध तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीमध्ये सात ते आठ पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची नावे आहेत. हा अर्ज डाॅक्टर तरुणीच्या स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये आहे.
या अर्जामध्ये खासदार आणि त्यांचा पीए असा उल्लेख करण्यात आला आहे. पोलिसांकडून काही आरोपी तपासणीसाठी आणण्यात आले होते आणि त्यावेळी त्या आरोपींची फिट प्रमाण प्रमाणपत्र द्यावं अशी मागणी करण्यात आली होती. त्या संदर्भात त्यांनी पीए यांच्या फोनवरून खासदारांना फोन लावून दिला होता. यामध्ये संबंधित खासदार तुम्ही बीडच्या असल्याने आरोपींना फिट देत नाही, असा संवाद झाला होता. त्यानंतर हे आरोप चुकीचे आहेत असेही म्हटल्याचे दिसून येते.
इतर महत्वाच्या बातम्या