मुंबई: नव्या नोटांच्या निर्णयाचा फटका वाहतूकदारांना बसला, पेट्रोल पंप आणि टोलनाक्यांवर संघर्षाचे प्रसंग निर्माण झाले.


पेट्रोल भरण्यासाठी पंपांवर दाखल झालेल्या वाहनचालकांना पंपवाल्यांशी झगडावं लागलं. एकीकडे प्रवाशांना 500 आणि 1000 रुपयांचे सुट्टे हवे होते... पण दुसरीकडे पेट्रोलपंपचालक मात्र 500 आणि 1000च्या पटीतच पेट्रोल देण्यास तयार होते. त्यामुळे अनेक पंपांवर संघर्षांचे प्रसंग निर्माण झाले.

तिकडे टोलनाक्यांवरही 500 आणि 1 हजारांच्या नोटा न स्वीकारल्यानं वाहतूकदार आणि टोलचालकांमध्ये बाचाबाचीचे प्रसंग उद्भवले. नवी मुंबईतल्या वाशीच्या टोलनाक्यावर तर या झगड्यांमुळे मोठी कोंडी झाली. त्यामुळे नंतर कोणताही टोल न घेता, वाहतूक सुरु करण्यात आली.

सीलिंकवरही आधी 500 आणि 1000 च्या नोटा स्वीकारल्या जात नव्हत्या. पण नंतर वाहनचालकांच्या रोषामुळे या नोटा स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे.

दरम्यान, पेट्रोलियममंत्री धर्मेंद प्रधान यांनी सर्व पेट्रोलपंप चालकांना पाचशे आणि हजाराच्या नोटा स्वीकारण्याचं आवाहन केलं आहे.