Maharashtra Sangli News : कृष्णा नदीत (Krishna River) लाखो मासे मृत होत असल्याच्या घटना सातत्यानं घडत आहेत. लाखो संख्येनं मासे मरण्यास कारणीभूत हे साखर कारखान्यांनी सोडलेले मळीमिश्रित घातक रसायनंच ठरत आहेत. दरवर्षी हा प्रकार घडतो. मात्र, त्याकडे फारसे यंत्रणा गांभीर्यानं पाहत नाही. नदीत मृत्यूमुखी पडलेले हेच मासे लोक नेऊन खातात आणि विकतात देखील. यातून विषबाधा होण्याच्या घटना घडू शकतात. तरी देखील सर्व शासकीय यंत्रणा कृष्णा नदीत होणाऱ्या प्रदूषणाकडे आणि लाखोंच्या संख्येनं मरणाऱ्या माशांच्या घटनेकडे सोयीस्करपणे कानाडोळा करत आहेत.
यंदा मात्र या सर्व घातक खेळ करणाऱ्यांविरोधात स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी हरित न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी राज्य शासनाच्या पर्यावरण आणि हवामान बदलाचे प्रधान सचिव, जिल्हाधिकारी, आयुक्त, प्रदुषण नियंत्रण मंडळाची सांगली, कोल्हापूर आणि पुणे येथील जबाबदार अधिकारी, मत्स्य विभागाचे अधिकारी यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.
यंदा जुलै महिन्यात कृष्णा नदीची पाणी पातळी वाढू लागताच नदीत लाखो मासे मेले. यावर प्रदूषण मंडळानं नदीतील पाण्याचे नमुने घेतले पण मासे नेमके कशाने मेले, पाण्यात काय मिसळले होते याचा अहवाल काही आला नाही. तोवर मागील देखील मौजे डीग्रज जवळ कृष्णा नदीत लाखो मासे मृतावस्थेत आढळले. जागोजागी नदीकाठाला माशांचा खच पडला होता. मौजे डिग्रज ते अंकलीपर्यंतच्या कृष्णा नदीपात्रात दुतर्फा हीच स्थिती होती. इतक्या मोठ्या संख्येनं आणि सातत्यानं मासे मरण्याचे घटना घडत असताना याचे प्रशासनला काहीही सोयरसुतक नसल्यची परिस्थिती आहे. दरवर्षी महापुराच्या पाण्यात घातक रसायनयुक्त पाणी सोडले जाते असा नदी काठच्या नागरिकांचा आरोप आहे. याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी सगळया गोष्टी माहित असून देखील त्याकडे सोयीस्करपणे डोळेझाक करतात.
दूषित पाणी कृष्णा नदीच्या सोडणाऱ्या एकाही साखर कारखान्यांवर आतापर्यंत प्रदुषण नियंत्रण मंडळाने कारवाई केलेली नाही. सांगलीच्या प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी इतक्या घटना घडून देखील कारवाईच्या बाबतीत मान टाकल्याने आता प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या पुणे उपप्रादेशिक कार्यालयानं कृष्णा नदी काठच्या एका कारखान्याला नोटीस बजावली आहे. कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुकच्या कृष्णा कारखान्याला ही नोटीस बजावली आहे. मात्र सांगली जिल्ह्याच्या हद्दीत अनेक कारखाने येतात. मात्र यातील कोणत्याही साखर कारखान्याला नोटीस बजावलेली नाही. अधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी पाणी नमुने घेतले आहेत. गाळमिश्रित पाण्यामुळेच, शेरीनाल्यामुळे मासे मेले असा पवित्रा प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या सांगलीतील कार्यालयाने घेतला आहे. त्याचवेळी पुण्यातील कार्यालयाने मात्र एका साखर कारखान्याला नोटीस बजावली आहे. मुळातच कारखान्याचे पाणी नदीत कोणता एक कारखाना सोडत नाही. असा प्रकार अनेक साखर कारखाने दरवर्षी करतात. त्यामुळे कृष्णा नदीत जे कारखाने दूषित पाणी सोडतात त्या सगळ्या कारखान्याना प्रदूषण मंडळाने तंबी देण्याची गरज आहे.