Aurangabad: सोमवारी संध्याकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडण्यात आले होते. ज्यातून 9 हजार 432 क्युसेकने विसर्ग करण्यात येत होता. मात्र आता आज सकाळी पुन्हा पाण्याचा विसर्गाचा वेग वाढवण्यात आला असून, धरणाच्या 18 मुख्य दरवाज्यातून सद्याच्या घडीला 18 हजार 864 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सलग तीन वर्षांपासून जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. मात्र तब्बल 34 वर्षांनंतर पहिल्यांदाच जुलै महिन्यात पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. नशिक जिल्ह्यात जुलै महिन्याच्या सुरवातीला दमदार पाऊस झाला. ज्यात तेथील धरणे पूर्ण क्षमतेने भरले आहेत. त्यामुळे वरील धरणातून गोदावरीत विसर्ग करण्यात आला होता. यामुळे जायकवाडी धरणाची पाणीपातळी वेगाने वाढली. दरम्यान धरणाचा पाणीसाठा 90 टक्के झाल्याने जायकवाडीतून पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आत्ताची परिस्थिती...
जायकवाडी धरणात सद्या 91.73 टक्के पाणीसाठा आहे. तर रात्री 10 ते 27 असे एकूण18 दरवाजे उघडण्यात आले आहे. सुरवातील हे दरवाजे अर्धा इंच ने उघडून 9 हजार 432 क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. मात्र आज सकाळी आठ वाजता हे 18 दरवाजे 1 इंच ने उचलून पाण्याचा विसर्ग 18 हजार 864 क्युसेकने करण्यात आला आहे. सोबतच धरणावरील जलविद्युत केंद्रातून सुद्धा 1589 क्युसेक असा एकूण 20 हजार 453 क्युसेकने धरणातून विसर्ग सुरु आहे.
नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा...
जायकवाडी धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याचा विसर्ग आणखी वाढवण्यात आला आहे. तसेच पाण्याची आवक वाढल्यास यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोदावरी नदी काठच्या दोन्ही बाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच पुराच्या पाण्यात कुणीही उतरू नयेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच या गावातील स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांना याबाबत सूचना करण्यात आल्या असून, गावातच राहण्याचे सुद्धा सांगण्यात आले आहे.