सोलापूर : सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत बोगस जात प्रमाणपत्र दाखल केल्याचा आरोप करत प्रमोद गायकवाड यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.


प्रमोद गायकवाड यांनी दाखल केलेल्या याचिकेत सोलापूर जिल्हाधिकारी, अक्कलकोट तहसीलदार, जात पडताळणी समिती सोलापूर, निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांचा देखील समावेश करण्यात आला आहे. यासंदर्भात प्रतिवादींना नोटीस पाठवण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायलायने याचिकाकर्त्यांना दिले आहेत. त्यासाठी प्रतिवादींना 5 नोव्हेंबरपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे न्यायालयाकडून निर्देश देण्यात आले आहेत.


लोकसभा निवडणुकीत भाजपचे डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या उमेदवारी अर्जाबद्दल अपक्ष उमेदवार प्रमोद गायकवाड यांनी हरकत घेतली होती. त्यांची ही हरकत अमान्य करत निर्णय अधिकाऱ्यांनी जयसिद्धेश्वर महास्वामींचा अर्ज वैध ठरवला. त्यामुळे गायकवाड यांनी उच्च न्यायालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध दाद मागितली होती.


सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव होता. खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी बेडा जंगम जातीचा दाखला सादर करत निवडणूक लढविली होती. मात्र जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचे मूळ प्रमाणपत्र हिंदू लिंगायत असून त्यांनी बोगस जातीचा दाखला मिळवला असून त्याचे पुरावे आमच्याकडे असल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे. याचिकाकर्त्यांच्यामार्फत वकील हेमंत घाडेगावकर आणि संदेश मोरे यांनी काम पाहिले.